पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. हे गैरव्यवहार ‘लक्षवेधी’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन एक महिना झाला, तरी अद्याप चौकशीचे घोंगडे भिजत पडले आहे. दरम्यान. तीन तारखेला आता तक्रारदारांना म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात आले आहे.

डहाणू तालुक्यातील गंजाड, आशागड तसेच अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले. तेथील डॉक्टरांच्या गैरव्यवहाराबाबत वाहन चालक तसेच अन्य काही कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या. ॲम्बुलन्सचे पासिंग न करता ती चालवली. तिचा अपघात झाला. या प्रकरणी जिल्हा परिषदेने जबाबदारी घेण्याऐवजी वाहनचालकावर जबाबदारी ढकलून जिल्हा परिषद मोकळी झाली. गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने याबाबत पत्र पाठवून त्याबाबतची माहिती मागवली होती आणि चौकशीचे आदेश ही दिले होते; परंतु त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे.
तक्रारींना केराची टोपली
तक्रारदारांनी फार पूर्वीच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी देऊनही, त्या वेळी त्यांची दखल घेतली गेली नाही. ‘लक्षवेधी’ने हे गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. सुरुवातीला पाच दिवसांत अहवाल मागून कारवाई करतो, आरोग्य विभागाने सांगितले होते. नंतर आणखी पंधरा दिवस चौकशीसाठी घेतले; परंतु त्यानंतर ही अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.
सेवा खंडीत; परंतु कागदपत्रांत फेरफार
विशेष म्हणजे या काळात डॉ. अक्षय गडग यांची सेवा पुढे चालू ठेवली नसली, तरी त्यांचे आरोग्य केंद्रात संबंध असून कागदपत्रात त्यांनी बदल केले असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीधर वायडा यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेले कागद आणि पूर्वीच्या काही कागदपत्रांत आता बरीच तफावत दिसत असून, ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनी कागदपत्रात फेरफार केले तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे. वायडा याबाबत दोन्ही कागदपत्रे घेऊन पालवे यांच्याकडे दाद मागणार आहेत.
जिल्हा आरोग्य विभागावर संशय
वास्तविक तक्रार आल्यानंतर लगेचच आरोग्य विभागाने चौकशी करायला हवी होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश देईपर्यंत जिल्हा आरोग्य विभागाने थांबण्याची आवश्यकता नव्हती; परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय गडग तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप गाडेकर यांना वाचवण्याचे काम आरोग्य विभागाने केला असल्याचा आरोप आता वायडा यांनी केला आहे.
पुरावे देऊनही चालढकलपणा
आरोग्य केंद्रातील कंत्राटी वाहन चालक सचिन ठाकरे आणि किरण डोंगरकर यांनी पुराव्यानिशी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसा गैरव्यवहार केला, याचे तपशील दिले होते. बँकांची कागदपत्रे ही सादर केली होती. ठाकरे यांच्या नावावर जमा झालेली रक्कम डॉक्टरांनी कशी काढून घेतली याचा तपशील देण्यात आला होता. याशिवाय वाहनावर कंत्राटी चालक असलेल्या सचिन ठाकरे यालाच लाँडी चालक बनवून त्याच्या नावावर लाखो रुपयांची बिले कशी काढली, याचा तपशीलही ‘लक्षवेधी’ने दिला होता; याशिवाय काही महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. गडग यांच्याविषयी गंभीर स्वरूपाची तक्रारही केली होती.
‘सीईओं’नाच लक्ष घालावे लागणार
या पार्श्वभूमीवर आता तक्रारदारांना बोलवून त्यांचे जाबजबाब घेतले जाणार आहेत. वास्तविक तक्रारदारांनी अगोदरच कागदपत्रांनिशी तक्रारी केल्या होत्या. इतक्या दिवसानंतर कागदपत्रात काही बदल करण्यात आले की काय अशी शंका आता घेतली जात आहे. या प्रकरणात आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुन्हा लक्ष घालावे अशी मागणी आता होत आहे.