महाराष्ट्र राज्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नवकल्पनांमध्ये आघाडी घेत असून देशातील पहिले एआय विद्यापीठ येथे स्थापन करणार आहे. हे विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून कार्य करेल आणि उद्योग, शिक्षण क्षेत्र व सरकारी यंत्रणांमध्ये संशोधन, विकास आणि सहकार्याला चालना देईल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यदल स्थापन केले आहे, अशी घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच केली.
या कार्यदलात शिक्षण, उद्योग आणि सरकारी क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. आयआयटी मुंबई आणि आयआयएम मुंबई येथील तज्ज्ञांसह गुगल, महिंद्रा समूह आणि एलअँडटी या प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील समितीत आहेत. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग भागीदारी संदर्भात धोरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठी हे कार्यदल कार्यरत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि डेटा सुरक्षा परिषदेच्या तज्ज्ञांचा सहभाग एआय शिक्षण आणि विकासासाठी धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात मदत करेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, हे विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र ठरेल. उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि शासन यांच्यातील सहकार्याला चालना देईल. ही संकल्पना महाराष्ट्राला जागतिक स्तरावर एआय क्षेत्रात अग्रस्थानी आणेल आणि भारताच्या तांत्रिक प्रगतीस हातभार लावेल.
शेलार म्हणाले की, कार्यदलाने आतापर्यंत दोन बैठकांचे आयोजन केले असून विद्यापीठ स्थापनेच्या आराखड्यावर काम सुरू आहे. महाराष्ट्राला तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा हा निर्णय प्रतीक आहे.
तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता उपयोग लक्षात घेता असे विद्यापीठ स्थापन केल्यास महाराष्ट्र भविष्यात तांत्रिक प्रगतीत आघाडीवर राहील.
कार्यदलाची उद्दिष्ट्ये
मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये उत्कृष्टता व नवसंशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी एक महिन्याच्या आत शिफारसी सादर करणे
प्रशासन, उद्योग आणि सामाजिक परिवर्तनासाठी एआय आधारित उपाययोजना विकसित करणे
संशोधन, तांत्रिक प्रगती आणि भविष्यकालीन कार्यक्षमतेसाठी तयारी करणे