पालघर-योगेश चांदेकर
पालघरः ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’ नावाच्या संस्थेने सादर केलेल्या एका संशोधन अहवालानुसार राज्यातल्या दहा गरीब आमदारांत पालघर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. त्यात आ. विनोद निकोले यांची संपत्ती एक कोटी रुपयांच्या आत आहे.
राज्यातील दहा आमदारांची चल संपत्ती आणि अचल संपत्ती मिळून त्याचा एक संशोधन अहवाल तयार केला आहे. या आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवताना दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा संशोधन अहवाल तयार करण्यात आला आहे.
सर्वाधिक गरीब आमदार काँग्रेसचा
या अहवालानुसार राज्यात सर्वाधिक गरीब आमदार अकोला जिल्ह्यातील साजिद खान पठाण असून त्यांची एकूण संपत्ती नऊ लाख ३७९ रुपये आहे. ते काँग्रेसचे आमदार आहेत. कमी संपत्तीच्या आमदारांच्या संख्येत तीन आमदार भाजपचे, दोन आमदार शिवसेनेचा शिंदे गटाचे, एक आमदार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा असून एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. याशिवाय ‘एमआयएम’ चा एक आमदार आहे. माकपचाही एक आमदार आहे.
निकोले पुन्हा गरीब
यापूर्वीच्या गरीब आमदारांच्या यादीतही डहाणू विधानसभा मतदारसंघाचे माकपचे आमदार विनोद निकोले यांचा समावेश होता. आताही त्यांचा समावेश झाला आहे. निकोले हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची चल संपत्ती ३५ लाख चाळीस हजार ६७४ रुपये, तर अचल संपत्ती ४६ लाख ६१ हजार १२९ रुपये आहे. त्यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य ८२ लाख १८०३ रुपये आहे.
तरे दहाव्या क्रमांकावर
या आमदारांच्या संख्येत संपत्तीच्या बाबतीत बोईसरचे आमदार विलास तरे हे दहाव्या क्रमांकावर असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडून आले आहेत. ते याअगोदर एकदा आमदार होते. त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांचा पराभव केला. त्यांची संपत्ती एक कोटी सहा लाख ७९ हजार ५२१ रुपये असून त्यात चल संपत्ती ३२ लाख ७५ हजार अकरा रुपये, तर अचलसंपत्ती ७४ लाख चार हजार ५१० रुपये आहे. निकोले डहाणू विधानसभा मतदारसंघातून माकपचे आमदार आहेत.
अन्य आमदार गरीब
राज्यातल्या अन्य आमदारांचा विचार करता वाशिमचे आमदार श्याम खोडे हे भाजपचे असून त्याची एकूण संपत्ती ३१ लाख ५९ हजार ५१३ रुपये आहे, तर सांगलीतून निवडून आले गोपीचंद पडळकर या भाजपच्या आमदारांची एकूण संपत्ती ६५ लाख ३३ हजार ६१७ रुपये आहे.
थोरात यांचा पराभव करणारे खताळही गरीब
शिवसेनेच्या शिंदे गटाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार अमोल खताळ यांची एकूण संपत्ती ६६ लाख ७१ हजार ७४४ रुपये आहे. त्यांची ओळख ‘जायंट किलर’ म्हणून केली जाते. त्यांनी काँग्रेसचे सात वेळा निवडून आलेले आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. एकदम साधी राहणी आणि मोठी विचारसरणी असलेल्या आर आर पाटील यांच्या मुलाची संपत्ती ही कमीच आहे. रोहित पाटील हे तासगावमधून पहिल्यांदाच निवडून आले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार, माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव केला. त्यांची एकूण संपत्ती ८६ लाख ८० हजार ९७५ रुपये आहे.
‘एमआयएम’च्या आमदाराची संपत्तीही कमीच
मालेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या ‘एमआयएम’च्या मुक्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल यांची संपत्ती ७५ लाख तीस हजार २७ रुपये आहे, तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा मतदार संघातून निवडून आलेल्या प्रवीण स्वामी या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदाराची संपत्ती ८२ लाख ९५ हजार ४८८ रुपये आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदार संघातून भाजपाचे किसन वानखेडे निवडून आले असून त्यांची संपत्ती ९४ लाख ८८ हजार ८१० रुपये आहे