पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतीच्या १३ लाख पन्नास हजार रुपयांच्या आगाऊ पेमेंट बाबत करण्यात आलेल्या तक्रारीची पंचायत समिती चौकशी करत असतानाच आता भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण उघड झाले आहे. विकास आराखड्यात मंजूर नसलेली कामे करून, त्यातून पैसे काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिलेले नसतानाही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पैसे दिले कसे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कोणत्याही ग्रामपंचायतीत विकासाची कामे करायची असतील, तर ती विकास आराखड्यात समाविष्ट करावी लागतात. विकास आराखड्याला ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायत सदस्यांची मंजुरी घेऊन या मंजुरीनंतरच ती कामे केली जात असतात; शिवाय मंजूर कामे पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाचा दाखला दिल्याशिवाय या कामाचे पैसे काढता येत नाहीत; परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसवून विकास आराखड्यावरती सरपंच, विस्तार अधिकारी, उपअभियंता, बांधकाम विभाग , पाणीपुरवठा, विभाग पाटबंधारे विभाग व गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असताना ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांनी फक्त स्वतःच्या स्वाक्षरी करून हा आराखडा अपलोड केला जेणेकरून त्यांना यापूढे चुकीच्या गोष्टी करता येतील आराखडा हा पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांना दाखवल्याशिवाय अपलोड करता येत नाही. दर तीन महिन्याला असणाऱ्या दप्तर तपासणीत विस्तार अधिकारी यांना ही बाब का आढळली नाही या विभागातील विस्तार अधिकारी संदीप जाधव याच ग्रामपंचायतीचे पूर्वी प्रशासक असतांना सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे पुरावे लक्षवेधीच्या हाती लागले आहेत.
एकाच फर्मला कामे का?
ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांच्या पूर्वीच्या कामाबाबतच अनियमिततेची तक्रार असून आता आणखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर पूर्वीच्या तक्रारीची चौकशीची टागंती तलवार अजूनही कायम असताना ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच कामे वसईच्या बालाजी इंटरप्राइजेस या फर्मला देण्यात आली. या फर्मची पूर्वीची कामेही वादग्रस्त असताना पुन्हा त्याच फर्मला पुन्हा पुन्हा कामे का दिली जातात, हा संशय निर्माण करणारा मुद्दा आहे.
आराखडाबाह्य कामावर खर्च
सरपंच सुनीता कामडी यांनी यापूर्वी पाचलकर यांच्यावर चुकीचे काम केल्याचा ठपका ठेवला. विश्वासात न घेता कामाचे पैसे काढले असे आरोप त्यांनी केले. याबाबत आता त्यांची पंचायत समिती चौकशी करीत आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षातील विकास आराखड्यात मंजूर नसलेली आराखडेबाह्य कामे हाती घेऊन या कामाचे पैसे काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
पूर्णत्त्वाच्या दाखल्याशिवाय पैसे
कोणतेही काम पूर्ण झाल्याचा दाखला जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे पैसे देता येत नाहीत. असे असतानाही या कामातही पुन्हा पैसे काढण्यात आले आहेत. पाच अंगणवाडी आणि पाच शाळा अशा दहा ठिकाणच्या कामांचे पैसे दिले असले, तरी प्रत्यक्षात ही कामे पूर्ण झाल्याचे फोटो अपलोड करताना मात्र एकाच ठिकाणचे फोटो अपलोड करण्यात आला असून त्यात आता संगणक ऑपरेटर प्रकाश गायकवाड हा ही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एकाच ठिकाणचे फोटो अपलोड करून पाच दहा ठिकाणी कामे झाल्याचे दाखवणे आणि पैसे काढणे हा गंभीर प्रकार आहे. एकच योजना दाखवून अन्य योजनातही पैसे काढण्याचे प्रकार झाले आहेत.
उपसरंपचांची कठोर कारवाईची मागणी
उपसरपंच हरेश मुकणे यांनीही हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामसभेत आणि मासिक सभेतही सर्वच सदस्यांनी जाब विचारला आहे. कोणतीही चुकीची कामे करू नका असे बजावले आहे. पारदर्शक पद्धतीने कामे करण्यास सांगूनही आम्हाला विश्वासात न घेता कामे केली जातात. मासिक बैठकीसमोर विषय न येता बिले काढली जातात. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे याबाबतचे उत्तर प्रशासकीय नाही. त्यांनी यापूर्वी चूक मान्य केली. असे असताना आता पुन्हा त्यांनी चुकीचे काम केले असून आम्ही त्यांना तुमची चूक तुमच्या स्तरावर निसरा असे बजावले असल्याचे मुकणे यांनी सांगितले.
कोट
‘कामाचा दर्जा, योग्य काम आणि नियमानुसार काम करा अशा आमच्या सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत. असे असतानाही ते आम्हाला विश्वासात न घेताच कारभार करतात. किती कामे सुरू केली, किती कामे काढली, किती कामे कोणाला दिली आणि किती पैसे दिले याबाबत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. ते चुकीचा कारभार करत असून याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
हरेश मुकणे, उपसरपंच, कासाकोट
‘कासा ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभारासंदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या असून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवल्यानंतर त्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू.
चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर
कोट
‘कासा ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभारासंदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या असून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवल्यानंतर त्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू.
चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर