पालघर-योगेश चांदेकर
पालघरः कासा ग्रामपंचायतच्या गैरकारभाऱ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्यासह तिघांनी या ग्रामपंचायत कारभाराची आज प्रत्यक्षात भेट देऊन चौकशी केली, तेव्हा त्यात अनियमितता आढळली. वेळच्या वेळी ग्रामपंचायतीची तपासणी न झाल्याने गैरव्यवहार करण्यास संधी मिळाली, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांनी चार वर्षात एकच अंगणवाडी दोनदा डिजिटल केली. विशेष म्हणजे या अंगणवाडीला वीजपुरवठा नाही. डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतच्या कारभारामुळे आता एकूणच पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारे ‘आका’ कोण, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
नियमित दप्तर तपासणी नाही
केवळ कासा ग्रामपंचायतीतच नाही, तर डहाणू तालुक्यातील अन्य ग्रामपंचायती तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतची पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांमार्फत नियमित दप्तर तपासणी होते का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. ग्रामपंचायतींना मिळणारा निधी, झालेला खर्च आणि प्रत्यक्षात झालेले काम याची पडताळणी पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांनी वारंवार करायला हवी; परंतु तसे केल्याचे दिसत नाही.
विशेष ग्रामसभेचा नियमही धाब्यावर
राज्य सरकारचे ग्रामसभा बाबतचे काही नियम असतात. हे नियमही बऱ्याच ठिकाणी पाळले जात नाहीत. २६ जानेवारीला ग्रामसभा घेण्याचा नियम असताना कासा ग्रामपंचायतमध्ये अशी ग्रामसभा झालेली नाही, असे गटविकास अधिकारी सस्ते यांना चौकशीच्या वेळी सांगण्यात आले असे समजते. याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करताना ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसभा तसेच मासिक सभेला विश्वासात घेऊन करावे लागते; परंतु कासा ग्रामपंचायतीत असा काही प्रकार न होता कामे करण्यात आल्याचे वेगवेगळ्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.
कामे केली;परंतु आराखड्यात नसलेली
ग्रामपंचायतीचा विकास कामाचा दरवर्षी आराखडा तयार होत असतो. त्या आराखड्यानुसार विकासकामे करणे अपेक्षित असते; परंतु ग्रामसभा आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ठरवलेल्या विकास आराखड्यातील कामे न घेता प्रत्यक्षात आराखडाबाह्य कामे घेऊन ती का करण्यात आली, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
ठराविक संस्थांना दिलेल्या कामाचीही व्हावी चौकशी
याशिवाय ग्रामपंचायतची कोणतीही कामे किंवा खरेदी निविदा मागून करावी लागते. कमी दराच्या निविदा मंजूर करून त्यानुसार काम करणे अपेक्षित असते; परंतु डहाणू तालुक्यातील तसेच पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची बहुतांश कामे वसईतील बालाजी एंटरप्राइजेस आणि कल्पवृक्ष सोलर एनर्जी या दोनच कंपन्यांना का देण्यात आली, असा प्रश्न माजी पंचायत समिती सदस्य स्वाती राऊत यांनी उपस्थित केला आहे.
कामे न करताच पैसे देण्याची घाई
या कंपन्यांची कामे पूर्ण झालेली नसताना आणि त्यांच्या कामाच्या पूर्णत्वाचे दाखले नसतानाही त्यांना पैसे देण्यात घाई केली जाते आणि अन्य संस्थांची बिले मात्र तीन तीन वर्षापासून निघत नाहीत अशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सस्ते यांच्या भेटीच्या वेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य स्वाती राऊत यांनी पाचलकर यांच्या काळात चार वर्षात दोनदा डिजिटल झालेल्या अंगणवाडीची भेट घालून दिली. या अंगणवाडीला टीव्ही संच आहे. परंतु तो लावल्यापासून बंद आहे. पंखा दिवे नाही तसेच गेल्या पाच ते सहा वर्षापासून या अंगणवाडीला वीजपुरवठा होत नसताना ती डिजिटल कशी झाली, असा मुद्दाही यावेळू स्वाती राऊत यांनी उपस्थित केला.
बऱ्याच कामात अनियमितता
दरम्यान, याप्रकरणी प्राथमिक तपासणीत बरीच अनियमिता आढळल्याचे समजते. आराखडाबाह्य कामे करणे, कामे पूर्ण न होताच आगाऊ बिले देणे, पूर्णत्वाचे दाखले न घेता संबंधितांना पैसे देणे आणि एकाच फर्मला खरेदीचे आणि रंगाचे काम देणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. आता याप्रकरणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या पथकाचा अहवाल काय जातो आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यावर काय निर्णय घेतात, याकडे आता जिल्ह्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
‘अंगणवाडीला रंगरंगोटी करणे आणि चित्रे काढणे म्हणजे ती डिजिटल झाली असे नव्हे. एकच अंगणवाडी चार वर्षात दोनदा डिजिटल झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. प्रत्यक्षात या अंगणवाडीला वीज नाही. मोहन पाचलकर यांच्या काळात ग्रामपंचायतीतील झालेल्या गैरकारभाराची चौकशी करावी. याबाबत मीही गटविकास अधिकारी यांना तक्रार केली होती, त्यांना बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार आहे.
स्वाती राऊत, माजी पंचायत समिती सदस्य,