पालघर-योगेश चांदेकर
शून्य प्रकारात रेल्वे मंत्रालयाकडे केल्या काही मागण्या
पालघरः संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात खा. डॉ. हेमंत सवरा यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे विविध प्रश्न शून्य प्रहाराच्या चर्चेदरम्यान उपस्थित केले. या लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णांच्या प्रश्नांना वाचा फोडून रेल्वेच्या काही उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली.
पालघर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांची गेल्या वर्षभरापासून खा. डॉ. सवरा वेगवेगळ्या व्यासपीठावर चर्चा करीत आहेत. रेल्वेचे विविध प्रश्न यापूर्वी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मांडले. काही प्रश्नांवर त्यांनी उपाययोजना सुचवल्या. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना काही निवेदनेही दिली.
बोर्डी, घोलवड, उंबरगावच्या प्रश्नांना वाचा
लोकसभेत शून्य प्रहारच्या चर्चेदरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या काही प्रश्नांवर चर्चा केली. डहाणूच्या पुढील बोर्डी, घोलवड आणि उंबरगाव परिसरातील रेल्वेचे प्रश्न मांडले. या भागात रेल्वेच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यापाऱ्यांचे कसे हाल होतात, यावर त्यांनी भाष्य केले. सध्या लोकल सेवा डहाणूपर्यंत उपलब्ध असून त्यापुढे घोलवड व उंबरगावपर्यंत ही सेवा वाढवावी, अशी मागणी डॉ. सवरा यांनी केली. उंबरगावपर्यंत लोकल रेल्वे सेवा सुरू केली, तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
वलसाड-विरार पॅसेंजर पूर्वीच्या वेळेवर सुरू करा
पूर्वी वलसाड-विरार पॅसेंजर सुरू होती. त्यामुळे प्रवाशांना चांगला पर्याय उपलब्ध होता; मात्र वलसाड- विरार पॅसेंजरची वेळ बदलल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वलसाड-विरार पॅसेंजरची वेळ पूर्वीप्रमाणे ठेवावी आणि तिला घोलवड स्थानकावर थांबा द्यावा, अशी मागणी डॉ. सवरा यांनी केली. त्याचबरोबर उधना-बांद्रा सुपरफास्ट एक्सप्रेस दररोज करावी आणि तिलाही घोलवड रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
जिने, लिफ्ट सुरू करा
या तीनही रेल्वे स्टेशनवर जिने, लिफ्ट बसवावेत. रिटर्न तिकिटाची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रवाशांना अधिक सोयी, सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून फलाटावर शेड बसवण्यात यावी. त्यामुळे प्रवाशांची उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सोय होईल, अशी मागणी त्यांनी केली. सेवा सुधारल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल असे सांगताना रेल्वे मंत्रालयाने याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ.सवरा यांनी केली.