banner 728x90

कासा ग्रामपंचायतीची ‘बालाजी एंटरप्राइजेस’वर कृपादृष्टी! जाहिरात न देता नियमबाह्य कामे दिल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट बालाजी इंटरप्राईजेस ब्लॅक लिस्ट’मध्ये जाण्याची शक्यता

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघरः डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायतच्या अनियमित कारभारावर ‘लक्षवेधी’ने प्रकाश टाकल्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच विस्तार अधिकारी संदीप जाधव यांनी केलेल्या चौकशीत ग्रामपंचायतच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला आहे. विशेषतः वसईच्या बालाजी एंटरप्राइजेसला कामे देताना या कंपनीवर मेहेरनजर ठेवण्यात आली तसेच नियम धाब्यावर बसून कामे देण्यात आली. त्यामुळे ही कंपनी आता ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये जाण्याची शक्यता आहे.
लक्षवेधी’ने कासा ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर प्रकाश टाकला होता. यामध्ये कामे पूर्ण न करता ‘बालाजी एंटरप्राजेस’ला १३ लाख ५० हजार रुपयांचे आगाऊ पेमेंट करण्यात आले. तसेच रंगरंगोटीची मोठी बिले काढण्यात आली. कामाच्या पूर्ततेचे अहवाल न घेताच आगाऊ रक्कम देण्यात आल्यामुळे ही पुरवठादार कंपनी आणि ग्रामपंचायत ही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. कासा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता लक्षात आणून दिली होती.

banner 325x300

बालाजी एंटरप्रायझेस’बाबत संशय
पालघर जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायत आणि शाळांची कामे ‘बालाजी इंटरप्राईजेस’ला देण्यात आली. त्यामुळे ही एजन्सी आणि ग्रामपंचायत यांच्यात काही साटेलोटे आहे का, असा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पालघर जिल्ह्य उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या माजी सदस्य स्वाती राऊत यांनीही ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांच्या विषयी तक्रारी केल्या होत्या. ग्रामपंचायत मनमानी कारभार करत असून आर्थिक व्यवहारात तफावत असल्याचे निदर्शनास आले होते. कासा ग्रामपंचायतीतील एक संगणक कर्मचारी या गैरव्यवहारात सहभागी आहे, याबाबतची माहिती राऊत यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दिली होती.

मुदत संपलेल्या सरंपचांच्या सहीनिशी व्यवहार
सरपंचाचा कालावधी संपल्यानंतर ‘डिजिटल सिग्नेचर’ चा वापर करून देयक अदा केल्याचे प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.याप्रकरणी दहा मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. यात काही बाबी स्पष्ट झाल्या. कासा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या २०२४-२५ प्राप्त निधीतून बालाजी एंटरप्रायजेसला तीन लाख रुपये देण्यात आले; परंतु प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. अंगणवाडी रंगरंगोटी आणि अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी आणखी एका अंगणवाडीला दोन लाख ऐंशी हजार रुपयांची अनामत रक्कम देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात कामे झाले नाहीत.

काम न करताच पैसे अदा
कासा ग्रामपंचायतीमध्ये कासा शाळा, कासा नर्सरी, घोळ, भराड, अशा चार स्वतंत्र अंगणवाडी केंद्राच्या इमारती असून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनुसार कासा नर्सरी या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे रंगोटीचे काम सुरू होते. इतर कोणत्याही अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोटीचे काम केलेले नाही, तरीही त्याचे पैसे मात्र ‘बालाजी एंटरप्रायजेस’ला अदा करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा गायकवाड पाडा, कदम पाडा या दोन शाळांच्या इमारतींना रंगरंगोटी केलेली आहे; मात्र कासा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आणि अन्य कोणत्याही शाळांना रंगरंगोटीची कामे करण्यात आली नाही, तरीही त्यांची बिले अदा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

‘बालाजी’साठी नियम धाब्यावर
निविदा प्रणाली करताना ग्रामपंचायतीने ‘बी वन’ प्रक्रिया केली नाही. कोटेशनचा तुलनात्मक तक्ता ग्रामपंचायत दप्तरी ठेवलेला नाही. नियमानुसार कमी निविदा असलेल्या कंपनीला काम देणे आवश्यक असताना अशा प्रकारची कोणतीच प्रक्रिया राबवली असल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायतीलाही याबाबतची नोंद नाही. असे असताना ‘बालाजी इंटरप्रायजेस’ला ग्रामपंचायतीने काम दिले; परंतु हा आदेशदेखील ठराविक नमुन्यात नाही. या सर्व कामांपोटी अकरा लाख ८० हजार रुपये एवढी रक्कम ‘बालाजी इंटरप्रायझेस’ला देण्यात आली. सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संयुक्त सहीद्वारे ही रक्कम अदा करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ‘बालाजी इंटरप्राईजेस’कडून कोटेशन मागविण्यात आले; परंतु त्याची जाहिरात कुठे दिलेली नव्हती, याचा अर्थ ‘बालाजी इंटरप्रायजेस’शी संगनमत करून ग्रामपंचायतीने हा व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामपंचायत अधिकारी मोहन पाचलकर यांनी कासा ग्रामपंचायतीत अपहार केल्याचे उघड झाले असून त्यांना तात्काळ निलंबीत करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!