पालघर-योगेश चांदेकर
पालघरः पालघर जिल्हा अस्तित्वात येऊन सात-आठ वर्षे झाले तरी अजूनही या जिल्ह्याच्या ठिकाणी लांब पल्यांच्या गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होती याबाबत खा. डॉ. हेमंत सवरा यांनी संसदेच्या दोन अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर आता पालघर येथे दादर-बिकानेर एक्सप्रेस व कच्छ एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
डॉ. सवरा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सातत्याने रेल्वेचे प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. पालघर विभागाच्या रेल्वेच्या अनेक प्रश्नांना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून वाचा फोडली. लोकसभेत लक्षवेधी मांडली. लोकसभेत या विषयावर त्यांनी चर्चा घडवून आणली. त्याचबरोबर रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांची भेट घेऊन त्यांनाही या मागण्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळत असल्याचे दिसते.
कच्छ व बिकानेर एक्सप्रेसला थांबे
रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे त्यांनी केलेल्या पाठपुरावानंतर पालघर येथे कच्छ एक्सप्रेस व दादर-बिकानेर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याबाबतची माहिती खा. सवरा यांना कळविण्यात आली आहे. या दोन गाड्यांसह बांद्रासोबत-सुरत इंटरसिटी एक्सप्रेस व बांद्रा- गाझिपूर एक्सप्रेस या दोन लांबपर्यंतच्या गाड्यांनाही पालघर स्टेशनवर थांबा मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पालघरला का हवा थांबा?
पालघर येथे आता चौथी मुंबई वसवली जात आहे. याशिवाय मुकेश अंबानी पालघरच्या औद्योगिक उपस्थितीत मोठी गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर आता वाढवण बंदर मंजूर झाले असून, त्या बंदराच्या कामालाही चालना मिळणार आहे. पालघर-नाशिक द्रुतगती मार्ग, मुंबई-वडोदरा मार्ग, नवी दिल्ली-मुंबई कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन असे वेगवेगळे पायाभूत प्रकल्प पालघर जिल्ह्यात होत असून पालघर जिल्ह्याची लोकसंख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधांसाठी आग्रह
पालघरला चौथी मुंबई विकसित करण्यात येणार असून येथे विमानतळ उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी केली होती. त्यामुळे आता पालघर उपविभागातील सर्वच रेल्वे स्टेशन तसेच अन्य पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी डॉ. सवरा हे वारंवार करत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून पालघरमधील उपनगरीय रेल्वे सेवा तसेच लांब पल्यांच्या गाड्यांबाबत अधिक सुविधा आणि अधिक थांबे देण्याची मागणी डॉ. सवरा करीत असून त्यांनी वारंवार केलेल्या पाठपुरामुळे यातील काही प्रश्न आता निकाली निघत आहेत. दादर-बिकानेर आणि कच्छ एक्सप्रेस या दोन गाड्यांना पालघरला थांबा मिळाल्यामुळे खासदार डॉ. सवरा यांनी रेल्वे मंत्र्यांचे व रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे.

















