पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची शनिवारी निवडणूक असून या निवडणुकीच्या १५ जागांसाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत दोन पॅनल आपले भवितव्य आजमावत असले, तरी पूर्वीचे सत्ताधारी आणि आत्ताचे सत्ताधारी एकत्र येऊन तयार केलेल्या डहाणू विकास आघाडी पॅनेलची या निवडणुकीत सरशी होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण विरोधकांना सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत.
डहाणू जनता को ऑपरेटिव्ह बँकेच्या १५ जागा असून त्यापैकी महिला राखीवमधील दोनही जागा डहाणू विकास आघाडीच्या पारड्यात गेल्या आहेत. उन्नती राऊत व वैशाली बोथरा या दोन्ही महिला बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता १३ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात डहाणू विकास आघाडीने सर्वच १३ जागांवर उमेदवार दिले आहेत तर विरोधी प्रगती जनता पॅनलला अवघ्या नऊ जागांवर उमेदवार देता आले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण गटातील चार जागांची निवडणूक ही सत्ताधारी आघाडीने जिंकल्यात जमा आहे.
पॅनेलनिहाय मतदानावर भर
या निवडणुकीत माजी आमदार आनंदभाई ठाकूर आणि डहाणूचे माजी नगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, मिहीर शहा यांनी एकत्र येऊन डहाणू विकास आघाडी हे पॅनल तयार केले आहे. आर्थिक संस्थेत कोणतेही राजकारण नको या भावनेने त्यांनी ही निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले; परंतु प्रगती जनता पॅनलने नऊ जागांवर उमेदवार दिल्याने निवडणूक बिनविरोध करता आली नाही. आता आनंदभाई ठाकूर आणि भरत राजपूत तसेच मिहीर शहा हे त्रिकूट जास्तीत जास्त मतदान पॅनलनिहाय कसे होईल, यासाठी प्रयत्न करत आहे.
बँकेच्या ठेवी पाचशे कोटींच्या करणार
बँकेच्या ठेवी १५० कोटी रुपयांवरून पाचशे कोटी रुपयांपर्यंत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्राहकांचा विश्वास, आकर्षक योजना आणि उत्कृष्ट सेवा यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरक्षित कर्ज वाटपासाठी धोरण आखण्यात येणार आहे. स्थानिक उद्योग, शेतकरी, स्वयंसहायता बचत गट आणि नोकरदारांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात येणार आहेत; याशिवाय बँकेचे डिजिटल व आधुनिक सुविधा नागरिकांना घरबसल्या देता येणार आहेत. एटीएम जाळेही डहाणू आणि पालघर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार असून डेबिट कार्डची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण, योग्य मूल्यांकन चांगले राहण्यास मदत झाल्याचा दावा भरत राजपूत यांनी केला असून ‘तुमची बँक तुमचं भविष्य’ या टॅगलाईनवर निवडणुकीत भर देण्यात आला आहे.
नवीन शाखा उघडणार
पालघर जिल्ह्यात नवीन शाखा उघडण्यात येणार असून बोईसर, पालघर, मनोर यासारख्या भागात नवीन शाखा सुरू करून ग्रामीण आणि उपनगरातील लोकांना बँकिंग सेवा पुरवण्यात येणार आहे. पारदर्शक कारभार करण्यावर बँकेचा भर असून या बँकेचे सुमारे साडेसात हजार सभासद आहेत. या सभासदांनी पॅनेलनिहाय मतदान करावे असा सत्ताधारी गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आनंदभाई ठाकूर, भरत राजपूत आणि मिहीर शहा यांचे प्रयत्न सुरू आहेत. बँकेची निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हे पॅनल प्रयत्न करीत आहे. सभासद आमच्यावर निश्चित विश्वास टाकतील, असा विश्वास भरत राजपूत यांनी व्यक्त केला.
शून्य एऩपीए
२६ एप्रिलला या बँकेसाठी मतदान होणार आहे; परंतु या बँकेतील सध्याचे सत्ताधारी आणि पूर्वीचे सत्ताधारी आता एकत्र आले आहेत. डहाणू जनता को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना १९५७ मध्ये करण्यात आली. या बँकेच्या चार शाखा असून तिचे १५ हजार ६२९ सभासद आहेत. त्यापैकी सात हजार ५१५ सभासदांना मतदानाचा हक्क बजावता येईल. या बँकेचे भागभांडवल पाच कोटी ७७ लाख ९२ हजार आहे, तर ठेवी १५७ कोटी ४९ लाख एक हजार रुपयांच्या आहेत. बँकेने शंभर कोटी ३९ लाख तीस हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचा एकूण कारभार २५७ कोटी ८८ लाख ३१ हजार आहे. बँकेने ७३ कोटी ७१ लाख १५ हजार रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. या बँकेला या वर्षात ‘बँक ऑफ ब्ल्यू रिबन अवार्ड’ मिळाले आहे. विशेष म्हणजे या बँकेतील सत्ताधाऱ्यांनी बँकेचे अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) शून्य ठेवण्यात यश मिळवले आहे.
‘डहाणू परिसरातील जनतेच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ही बँक स्थापन झाली असून या बँकेचा कारभार पारदर्शक पद्धतीने केला जात आहे. जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. आमच्या दोन जागा अगोदर निवडून आल्या असून आणखी चार जागा निवडून आल्यात जमा आहेत.
भरत राजपूत, डहाणू विकास आघाडी पॅनल