पालघर-योगेश चांदेकर
मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार
पालघरः वसई तालुक्यातील मच्छीमारांच्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी एक बैठक घेऊन मच्छीमारांचे विविध प्रश्न जाणून घेतले. मच्छीमारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर या प्रश्नासंदर्भात मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्याची चर्चाही या बैठकीत करण्यात आली.
वसई-विरार मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विधिमंडळाची दोन्ही अधिवेशन गाजवली. मतदारसंघातील विविध प्रश्न त्यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवले. त्याचबरोबर विविध समाज घटकांच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या व्यासपीठावर चर्चा केल्या आणि त्यातील काही प्रश्न मांडून ते सोडवले.
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा
राज्य सरकार आता मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. मच्छीमारांच्या मत्स्य व्यवसायाला आता कृषीचा दर्जा देण्यात आला असून त्या संदर्भातल्या अडीअडचणी, फायदे या संदर्भातही त्यांनी विविध मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांच्या प्रतिनिधींची मते ऐकून घेतली. वसई तालुक्यातील मच्छीमारांनी प्रामुख्याने कोळीवाड्याच्या जमिनी कोळी बांधवांच्या नावावर करण्याची मागणी केली. सात-बारावर मच्छीमारांची नावे आली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. त्याचबरोबर परप्रांतीय अतिक्रमणामुळे कोळी संस्कृतीचा ऱ्हास होत असून तो थांबवण्याची मागणी करण्यात आली. गुरुचरण जागा मच्छीमार उपक्रमासाठी राखीव ठेवाव्यात, रानगाव खाडीतील गाळ काढावा आदी मागण्या मच्छीमारांनी केल्या.
राणे यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढणार
हे सर्व प्रश्न आमदार दुबे-पंडित यांनी समजवून घेतले आणि ते सोडवण्याची ग्वाही दिली. आमदारांनी कोळी बांधवांची अशा प्रकारची पहिलीच बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याची दिशाही दिली. त्याबरोबरच राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मच्छीमारांच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे नियोजन केले. त्यामुळे विविध मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना आपल्या प्रश्नांना आता निश्चित न्याय मिळेल असा विश्वास निर्माण झाला आहे.
‘या’ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित
आमदार दुबे-पंडित यांच्या सोबतच्या या बैठकीला वसई मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था. खोचिवडे मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था. नायगाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था, जय श्रीराम मच्छीमार सहकारी संस्था अर्नाळा, दर्यासागर मच्छीमार सहकारी संस्था, सागरपूजन मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था, अर्नाळा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोट
‘राज्य सरकार मच्छीमारांसाठी विविध योजना नव्याने आखत आहेत. त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. राज्यात मत्स्योद्योगाला शेतीचा दर्जा देण्यात येणार असून त्यामुळे मच्छीमारांचा आर्थिक विकास होणार आहे. त्यासाठी त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासाठी काय करता येईल, यासाठी ही बैठक घेतली. या बैठकीतील प्रश्नांवर राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या समवेत बैठक घेऊन हे प्रश्न निकाली काढले जातील.
स्नेहा दुबे-पंडित, आमदार, वसई विधानसभा मतदारसंघ