पालघर-योगेश चांदेकर
‘मला एक असा तरुण मिळवून द्या, की जो शरीरानं तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा, विकारावर त्याचा ताबा आहे. त्याचं मन आरशासारखं पारदर्शक व स्वच्छ आहे, तर मी जगात कोणताही चमत्कार करून दाखवीन.
-थॉमस मॅक्सले
एका पाशात्य विचारवंताचा हा विचार युवकांना कसा असला पाहिजे हे सांगणार आहे. आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणजे युवक. सामाजिक उत्थान्नाची जबाबदारी असलेल्या अशा युवकात राकेश रत्नाकर यांचा समावेश होतो. त्यांचा आज वाढदिवस..त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ‘लक्षवेधी’च्या शुभेच्छा!
शिवसेनेच्या युवा आघाडीचे प्रमुख म्हणून काम करताना राकेश यांनी खऱ्या अर्थानं समाजसेवा कशी करावी याचा धडा घालून दिला आहे. अनेकदा युवकांवर टीका केली जाते. तरुणांपुढं आदर्श नाहीत, असं सांगितलं जातं; परंतु काही युवक असे असतात, की ते स्वतःच्या जगण्यातून, वागण्यातून आणि समाजसेवेतून एक स्वतःचा स्वतंत्र मार्ग चालतात आणि इतरांना आपल्या मार्गानं यायला भाग पाडतात. तरुणांनी दूरदृष्टीनं विचार करून काही मूलभूत आव्हान पेलली पाहिजेत आणि हे आव्हान पेलताना समाजासमोर नवा विचार दिला पाहिजे. व्यवसायात पैसे मिळवता येतात; परंतु त्यातून सामाजिक काम करण्याला मर्यादा असतात. राकेश रत्नाकर यांचंही तसंच आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी बांधकाम व्यवसायात मोठी मजल मारली. नाव कमावलं. पैसाही कमावला; परंतु त्यांच्याकडं लोक अनेक प्रश्न घेऊन येत. हे प्रश्न व्यवसायाच्या माध्यमातून सुटणं तसं उघड होतं, म्हणून त्यावर काय करता येईल आणि लोकांचे प्रश्न कसे मार्गी लावता येतील, याचा विचार ते करत होते. असा विचार करताना राजकीय पक्षात लोकांच्या मदतीला धावून जातात आणि राजकीय पक्षाच्या वजनाचा वापर करून लोकांचे प्रश्न मार्गी लावता येतात, असं राकेश यांच्या लक्षात आलं. स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर एकीकडं व्यवसाय करत असताना दुसरीकडं समाजासाठी ते काम करत होते. तरुण वर्गाविषयी समाजाची मतं वेगळी आहेत. वयानुसार समाजाची विभागणी करून युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. तरुणांना आपण युवक म्हणून कोणीतरी वेगळं आहोत, हे दाखवण्याची इच्छा असते. त्यामुळे या प्रश्नात काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि लोकांच्या अडीअडचणीला धावून गेलं पाहिजे. त्यासाठी संघटन पाहिजे आणि संघटना ही अशी पाहिजे, की जी जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन ते प्रश्न तातडीनं लावले पाहिजेत, हा विचार राकेश अर्थात रिकी रत्नाकर यांनी केला आणि त्यांच्या या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना शिवसेना जवळची वाटली.
राकेश यांच्यावर आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. आपण समाजात कसं वागणार आहोत, काय कार्य करणार आहोत आणि ती कामं लोकांच्या लक्षात राहतील की नाही, याचा विचार न करता केवळ समाजहीत आणि नैतिकता या मुद्दयावर त्यांनी काम सुरू केलं. त्याचबरोबर आपण कोणाला मदत केली, तर या हाताची मदत त्या हाताला कळलं नाही पाहिजे, हा जो संतांनी सांगितलेला दृष्टिकोन आहे, तो त्यांनी तंतोतंत पाळला. आनंद दिघे यांच्या सामाजिक कामाचा आणि त्यांनी जागच्या जागी प्रश्न कसे निकाली काढले, हे त्यांनी पाहिलं होतं. राकेश यांच्या मनावर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळं व्यवसाय करतानाही सामाजिक जबाबदारीचं भान कायम ठेवून ते वागत चालले आपण ज्या वाटेवर चाललो आहोत, ही वाट नैतिक आहे की अनैतिक आहे आणि वाईट कशाला म्हणावं, चांगलं कशाला म्हणावं याचा विचार हे सातत्यानं करतात. जगातील प्रत्येक माणूस हा नियतीनं दिलेली कामं करत असतो; परंतु स्वतःपेक्षा इतरांसाठी काय करता येईल हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येक माणसानं दोन माणसांना मदत करण्याचं ठरवलं, तरी जग प्रश्नमुक्त होईल असं मानणाऱ्यांतील राकेश आहेत. त्यामुळं शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा विचार त्यांना मनोमन पटला आणि हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्यातला शिवसैनिक जागा झाला. साधा शिवसैनिक म्हणून त्यांनी काम सुरू केलं आणि संघटन तसंच वेगवेगळ्या कामाच्या जोरावर ते पुढं पुढं जात राहिले. पक्ष त्यांच्यावर विश्वास ठेवत राहिला. आपल्या सामाजिक कामाला पक्षाबरोबरच स्वयंसेवी संस्थेच्या कामाची जोड त्यांनी घातली. त्यासाठी ‘हर्ष फाउंडेशन व साई प्रतिष्ठान ग्रुप’ या संस्थेची स्थापना करून तिच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावले.
ग्रामीण भागातील आरोग्य प्रश्न सुटले पाहिजेत, यावर त्यांचा भर असतो. कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाणं, प्रसंगी खिशाला खर्च पडला तरी चालेल; परंतु आरोग्य व अन्य संबंधित प्रश्नात कोणाची हेळसांड होऊ नये यावर त्यांचा भर होता. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना बळ दिलं. त्या बळाच्या जोरावर त्यांनी सामाजिक कामाचा आलेख उंचावत नेला. प्रसिद्धीचा जराही हव्यास न ठेवता ते सातत्यानं काम करत राहिले. पदाचा मोह नाही; परंतु समाजकार्य मात्र चालू राहिलं पाहिजे, ही त्यांची वृत्ती राहिली. वाड्या-पाड्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून पक्षाचं आणि युवकांचं संघटन करत गेले. त्या माध्यमातून लोक जोडले गेले आणि हे जोडलेले लोकच विविध निवडणुकांच्या निमित्तानं राकेश यांच्या शब्दाला मान देत पक्षाच्या मागं ठामपणे उभे राहिले. ‘वी डोन्ट नीड फॉलोअर्स, वी नीड आयडियर्स’ हे एक प्रसिद्ध वाक्य आहे. भारतीय युवकांच्या दृष्टीनं स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी व अगदीच अलीकडच्या काळातील म्हटलं तर डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. यांनाच आदर्श का म्हणावं यामागील काही महत्त्वाची कारणं आहेत आणि ही कारणं राकेश यांना मनोमन पटली आहेत. आदर्श व्यक्तिमत्व केवळ घराघरात नुसती आदर्शाची बीजं पोहोचवणंच नव्हे, तर ती रुजवणंही तेवढंच आवश्यक आहे आणि हे रुजवण्याचं काम आपल्या संघटनात्मक बांधणीतून राकेश करत असतात. अनेकदा युवकांच्या माध्यमातून ते समाजकारणाशी आणि त्यांच्या प्रश्नाशी जोडले आहेत. युवकांना केवळ राजकारणी लोक मतदार म्हणून पाहतात. त्यांचा फायद्यासाठी उपयोग करून घेतला जातो आणि नंतर त्याच्या समस्या कोणी सोडवतच नाही. असे प्रकार वारंवार घडतात.
अशावेळी
ध्येयाच्या वेदना मनाला होऊ दे
वार तुझ्या प्रत्येक क्षणात होऊ दे
असेच सगळं अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे
इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणास होऊ दे
अशी एक कविता आहे. संकटांना सामोरं जाण्यासाठी निधडी छाती असावी असते. आकाशाला गवसणी घालण्याचा सामर्थ्य लागतं, तरच उज्वल भारत वर्षाची निर्मिती होऊ शकते आणि ही निर्मिती केवळ युवक करू शकतात, हे मनोमन पटलेल्या राकेश यांनी संकटाच्या काळात लोकांना कायम मदतीचा हात दिला. त्याची काही उदाहरणं दिली तर ती वावगी ठरणार नाहीत. कोरोनाच्या काळात गुजरात राज्यातील ‘वेलस्पून’ या कंपनीत पालघर जिल्ह्यातील ६३ मुली अडकल्या होत्या. विक्रमगड, तलासरी, जव्हार या तालुक्यातील या मुलींना टाळेबंदीत अडकल्यामुळं कामही नव्हतं आणि मालकही मदत करत नव्हते. अशा परिस्थितीत या मुलींची माहिती राकेश यांना मिळाली. त्यांनी स्वखर्चानं एसटी बुक करून त्या मुलींना गुजरातमधून पालघरमध्ये आणलं त्यांची आरोग्य तपासणी केली आणि त्यासाठी ई-पासह अन्य सर्व काम त्यांनी केली. अशाच प्रकारे कोल्हापूरमध्ये अडकलेल्या तीस जणांचीही सुटका केली. युवकांचं आरोग्य चांगलं असेल, तर मन शरीर चांगलं राहतं. त्यातून चांगलं काम होतात. देश घडतो, यावर त्यांचा विश्वास आहे, म्हणून युवकांसाठी त्यांनी मोफत व्यायामशाळा सुरू केल्या. विशेषतः कबड्डी, क्रिकेट अशा स्पर्धांना प्रोत्साहन दिलं. त्यासाठी युवकांना आर्थिक मदत केली. क्रीडा पायाभूत सुविधा सुरू करण्यात त्यांचा हात कायम वरच असतो. रक्तदान शिबीर, विद्यार्थ्यांना मदत अशा अनेक कामात ते सातत्यानं पुढं असतात. कोरोनाकाळात रुग्णांना ज्या ज्या आरोग्यसेवेची गरज भासली किती आरोग्य सेवा त्यांनी दिली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही बसवून देणं असो की अडल्या नडलेल्यांना अन्नधान्य देणं. मदत माणसानं माणसासाठी जगावं, यावर त्यांचा भर असून त्याच माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी त्यांनी विक्रमगड, जव्हार, डहाणू परिसरात तयार केली आहे. ग्रामीण भागात युवकांना शिक्षित करणं, संघटित करणं आणि तिथल्या जनतेशी संबंधित प्रश्न सोडवण्यास त्यांना प्रवृत्त करणं यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी जी जी आव्हानं समोर येतात, त्या त्या आव्हानावर ते सातत्यानं मात करत असतात. युवा समाजाचा विकास हाच उद्याच्या समाजाचा विकास आहे, यावर त्यांचा विश्वास असून केवळ युवकांना राजकीय फायद्यासाठी वापरणार हे चूक असून राजकीय पक्षाच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवणे हे अतिशय महत्त्वाचं असतं, यावर राकेश रत्नाकर यांचा भर असतो.