पालघर-योगेश चांदेकर
पालघरः राज्यात सर्वच विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश घेता यावा, यासाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; परंतु त्यामुळे पालघरसारख्या आदिवासी व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात अडचणी येत आहेत, ही परिस्थिती लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन प्रणाली ही सुरू ठेवावी, अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर लगेचच अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात विद्यार्थ्यांना कुठेही आपल्या गुणवत्तेनुसार पहिल्या पसंतीच्या दहा महाविद्यालयात प्रवेश घेता येण्याची सोय उपलब्ध झाली असली, तरी फक्त ऑनलाईन प्रणाली ही ग्रामीण भागातील तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीची ठरली आहे, ही बाब खा. सवरा यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणली आहे.
पालघरमध्ये स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा अभाव
राज्याच्या अन्य भागात बहुतांश कुटुंबाकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध असली, तरी पालघरसारख्या आदिवासी आणि दुर्गम भागातील अनेक पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधांची बोंबाबोंब आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून अकरावीला प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. विहित मुदतीत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अनेक विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती असून त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात जाऊ शकते, असे खा. सवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणले आहे.
ऑफलाईन प्रक्रियेमुळे सर्वांनाच प्रवेश शक्य
या पार्श्वभूमीवर खा. सवरा यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पारंपारिक ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे. ऑफलाइन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाअधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुलभ होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
‘दहावीच्या निकालानंतर राज्यात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेशातील गैरप्रकार रोखून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे महाविद्यालय मिळण्यासाठी हा स्तुत्य निर्णय असला, तरी पालघरसारख्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे स्मार्टफोन त्यांच्याकडे नाहीत तसेच दुर्गम भाग असल्याने मोबाईलची रेंज मिळत नाही. त्यामुळे इंटरनेट सेवा ही उपलब्ध होत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन पालघर जिल्ह्यात अकरावीचे ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर