महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून रोजी सुरू होणार आहे.
बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै आणि दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थी, श्रेणी सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी यांना संधी मिळावी, यासाठी ही पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. यापूर्वी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येत होती. यंदा मात्र पुरवणी परीक्षा जून-जुलैमध्येच होणार आहे.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि अन्य संकेतस्थळांवरील, अन्य यंत्रणेने छपाई केलेले, अन्य माध्यमांतील वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. बारावीची माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने १५ आणि १६ जुलै रोजी होणार असल्याचेही मंडळाने सांगितले.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक
तपशील : बारावी : दहावी
लेखी परीक्षा : २४ जून ते १६ जुलै : २४ जून ते ८ जुलै
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जून ते ११ जुलै : २४ जून ते ८ जुलै
दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा : २४ जून ते ४ जुलै