पालघर-“सेवा विवेक” संस्थेचे प्रतिनिधी यांनी राजस्थानचे माननीय राज्यपाल श्री. हरीभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट घेतली. या विशेष प्रसंगी संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आणि प्रेरणादायी पुस्तक त्यांना सप्रेम भेट देण्यात आले.
या भेटीदरम्यान सेवा विवेक चे मार्गदर्शक व पद्मश्री श्री रमेश पतंगे, सेवा विवेक संस्थेचे संस्थापक श्री. प्रदीप गुप्ता आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (बांबू हस्तकला)श्री. लुकेश बंड हे देखील विशेष उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या या अनोख्या उपक्रमाची राज्यपाल महोदयांनी भरभरून प्रशंसा केली. त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सेवा विवेक संस्था करत असलेल्या कार्याला प्रोत्साहन देताना स्पष्टपणे म्हटले:
“सेवा विवेकचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.”
त्यांनी याच संवादात, सेवा विवेकच्या ग्रामविकास प्रकल्पास लवकरच प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ आणि व्यापक ओळख मिळणार आहे.
सेवा विवेक संस्थेचे ग्राम विकासाचे कार्य त्यातून आदिवासी महिलांना सन्मानजनक रोजगाराची निर्मिती आणि समाजाला दिशा देणाऱ्या कार्याचा एक सशक्त आदर्श ठरत आहे.

















