केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील जाहीर भाषणामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शाहांनी ठाकरेंना डिवचताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे.
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना शाहांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला.
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख
“पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्या परिवारासमोर मारण्याचे काम केले. गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल. 8 तारखेला पाकिस्तानने मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केला पण आपल्या डिफेन्स सिस्टीमने सर्व उध्वस्त केले. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला क्षतीग्रस्त केले,” असं शाह भाषणात म्हणाले. पुढे बोलताना, “‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले कि आमच्या महिलांचे सिंदूर खूप महत्वाचे आहे. ऑपरेशन सिंदूर वेळी ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ सुरु होते. यात आधी 31 नक्षली मारले गेले. त्यानंतर 36 नक्षलवादी मारले गेले. 31 मार्च 2026 पर्यंत या देशाच्या धर्तीवरून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट केला जाईल,” असं सरकारच्या भूमिकेबद्दल गृहमंत्र्यांनी म्हटलं.
पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका
पाकिस्तानविरोधातील कठोर भूमिकेसंदर्भातही सरकारी भूमिका शाह यांनी भाषणातून पुन्हा एकदा अधोरेखित केली. “ट्रेड आणि टेरर एकत्र चालणार नाही हे मोदी यांनी याआधीही स्पष्ट केले होते,” अशी आठवण शाहांनी करुन दिली.
…तर बाळासाहेबांनी मोदींना मिठी मारली असती
शाह यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधताना भारताची भूमिका जगभरामध्ये मांडण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचा ठाकरेंच्या शिवसेनेनं ‘वरात’ असा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरुन समाचार घेतला. “बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती,” असं अमित शाह म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेला काय झालंय?
“मला ठाऊक नाही उद्धव सेनेला काय झालं आहे. त्यांच्या पक्षातील सदस्याचा सामावेश असलेल्या प्रतिनिधी मंडळलाच ते वरात म्हणत आहेत,” असा टोला शाह यांनी लगावला आहे.
रात्री उशीरा अजित पवारांसोबत बैठक
दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी रात्री मुंबईत दाखल झाले. ते सह्याद्री अतिथी गृहावर मुक्कामी होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथिगृहावरून निघाल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार तिथेच होते. रात्री उशीरा अजित पवार आणि शाह यांची महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपा-शिवसेनेमध्ये फूट
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच पक्षाचं चिन्ह आणि नाव राहील असा निकाल निवडणूक आयोगाने दिला. शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहभागी झाली. तर सध्या ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीचा घटक असून विरोधी पक्षात आहे.