मुंबई: रविवारी (25 मे) रात्रीपासून ते सोमवारी (26 मे) दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता.
त्यामुळे मुंबईकरांचे खूपच हाल झाले. या पावसाचा अंदाज घेण्यात अपयशी ठरलेल्या हवामान खात्याने काल (27 मे) 24 तासांत ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याबाबत दिलेला इशारा हवेतच उडाला. तसे काही घडलेच नाही. त्यामुळे पालिका यंत्रणा आणि मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाल्याने आणि पालिकेसह इतर यंत्रणा पावसाळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने आज बुधवारी (28 मे) मंत्रालयात होऊ घातलेल्या महत्त्वाच्या बैठकीत कदाचित सदर घटनेचे पडसाद नक्कीच उमटतील. तसेच, मुंबईची तुंबई झाल्याने आणि हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने कदाचित हवामान खात्यावर शासनाची वीज कडाडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, आज दुपारी 1.03 वाजता मुंबईत समुद्रात मोठी भरती असणार आहे. किमान 4.88 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. महत्त्वाचे म्हणजे त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पुन्हा एकदा सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. मात्र सोमवारी पावसाचा रुद्रावतार पहिल्याने काल मुंबईकर पूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडले होते. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार दिवसभरात जोरदार पाऊस न पडल्याने धास्तावलेल्या मुंबईकरांनी ‘हुश्श, सुटलो बुवा एकदाचे’, असे म्हणत आणि आपले घर गाठत सुटकेचा निःश्वास सोडला.