पालघर-योगेश चांदेकर
आदिवासी, वेठबिगार, पीडितांना न्याय
संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे उत्थान
संविधानिक मार्गांनी गुंडगिरीवर प्रहार
पालघरः महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असलेल्या विवेक पंडित यांनी सामाजिक कामातून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबांना शिक्षणाची दारे खुली केली. त्याचबरोबर समाजवादी विचारांच्या व्यक्तींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कामाची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली.
विवेक पंडित यांनी तत्कालीन ठाणे जिल्ह्यात १९ ऑक्टोबर १९८२ रोजी श्रमजीवी संघटना स्थापन केली. या संघटनेच्या स्थापनेला नुकतीच ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक पंडित व विद्युल्लता पंडित यांनी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, जळगाव, नगर या जिल्ह्यात मोठे काम उभे केले आहे. कोठेही वेठबिगारी होत आहे, कामगारांना डांबून ठेवले आहे, अशी माहिती मिळाली की तिथे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते धावून जातात. त्यांची मुक्तता करतात.
संगमनेरातून वेठबिगारांची सुटका
केवळ तेवढ्यावर संघटना थांबत नाही, तर ठेकेदार, मुकादम यांच्या विरोधात लढा देतात. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील वेठबिगारांची पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. नामांतराच्या सत्याग्रहात पंडित यांनी १४ दिवसांचा तुरुंगवास झाला. श्रमजीवी संघटनेची पायाभरणी ही त्या कारावासाच्या काळातच झाली. श्रमावर जगणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ही संघटना करते. राष्ट्रसेवा दलाचे संस्कार व साने गुरुजींचा प्रभाव या संघटनेवर आहे
कर्जासाठी अनेकांवर वेठबिगारीची वेळ
लग्नासाठी कर्ज काढल्यानंतर कर्जदारांना मालकाकडे काम करावे लागते आणि त्यातून वेठबिगारी सुरू होते. अशा अडकलेल्या मजुरांची सुटका करणे आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यापासून श्रमजीवी संघटनेच्या कामाला सुरुवात झाली. कधी कधी मालकांचे त्यांच्यावर हल्ले झाले. संघटनेने हे हल्ले झेलले आणि वेठबिगारी निर्मूलन करण्यात पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे यश आले. या संघटनेने हजारो जणांना वेठबिगारी, गुलामगिरीतून मुक्त केले.
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
देशाच्या विविध राज्यात व नेपाळमध्ये जाऊनही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेतले. गुलामगिरी संपवण्यासाठी करत असलेल्या या आंतरराष्ट्रीय कामाबद्दल विवेक पंडित यांना पुरस्कार मिळाला. शेतमजुरांना वेतन मिळावे, म्हणून त्यांनी १४ दिवसांचा संप घडवून आणला. मजुरी वाढवली नाही, तर कामावर जाणार नाही असा इशारा देत शेतमजूर प्रत्येक गावात फेरी काढायचे आणि संप करायचे. मजुरांना मारहाण झाली. सुमारे तीनशे मजुरांना सात दिवस तुरुंगात धाडण्यात आले; परंतु तरीही श्रममजवी संघटनेने या कामगारांत विश्वास निर्माण केला आणि संघटनेने किमान मजुरीचा हा लढा जिंकला.
वीटभट्टी कामगारांना न्याय
वीटभट्टी मजुरांची मालकांकडून होणारी फसवणूक, भट्टीवर होणारे मृत्यू या विरोधात लढत मिळवून संबंधितांना नुकसान भरपाई देण्याचे काम त्यांनी केले. पंडित यांनी वसई पट्ट्यातील गुंडगिरीविरुद्ध लढा उभारला. त्यासाठी संघटनेने महत्त्वाचे काम केले. गरिबांकडून लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम परत द्यायला लावली. संघर्ष करण्यासाठी कार्यकर्त्यांचे सातत्याने प्रशिक्षण वर्ग घेतले. विविध कायदे, तक्रार करण्याच्या प्रक्रिया याविषयीचे प्रशिक्षण दिल्याने कार्यकर्ते तयार झाले. किमान वेतन लढा, लाटलेल्या जमिनीच्या विरोधात लढा, आदिवासींना जमिनीचे मालकी हक्क, वीटभट्टी कामगारांचा लढा, किमान वेतनासाठी संघर्ष, शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराविरोधातील लढा असे अनेक लढे दिले आणि त्यात त्यांना यश मिळाले.
२५ हजार मुले शिक्षणाच्या प्रवाहात
संघर्ष करताना अनेकदा मोठ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांच्यावर वैतरणा येथे हल्ला झाला. कार्यकर्त्यांवर अकरा वेळा जीवघेणे हल्ले झाले, तरी संघटनेने लढा सुरूच ठेवला. गेल्या ४३ वर्षांच्या काळात संघटनेने २५ हजाराहून अधिक आदिवासींना अतिक्रमित जमिनीचे प्लॉट दिले. हजाराहून अधिक एकर जमिनीचा ताबा मिळवून दिला. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून १५ लाखाहून अधिक झाडांची लागवड केली आणि वीटभट्टीवर येणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी भोंगा शाळा सुरू केल्या. सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले आणि अशा मुलांसाठी महात्मा फुले योजना हे धोरण राज्य शासनाला राबवायला पंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाग पाडले.
शेतीला उर्जितावस्था
हे संघर्षाचे काम सुरू असताना आदिवासींच्या मदतीसाठी विधायक काम करणारी विधायक संसद ही स्वतंत्र संस्था पंडित यांनी सुरू केली. या संस्थेमार्फत सुरुवातीला दवाखाना काढला. बालवाडी काढल्या. लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून शेळीपालन केले. गाई पाळल्या. सामूहिक शेतीसारखे प्रयोग केले. कलिंगडाची लागवड करायला प्रोत्साहन दिले. त्यासाठी बियाणे खते, डिझेल पंप, पुरवण्यात आले. अति तीव्र कुपोषण मुलांसाठी कायमस्वरूपी छावणी उभारण्यात आली व तिथे या मुलांना नियमित आहार दिला गेला. उपचार केले गेले व शेकडो मुलाचे प्राण वाचवण्यात संघटनेला यश मिळाले.
राजकीय यश
संघटनेने केलेल्या सामाजिक कामाच्या माध्यमातूनच दीडशे गावात श्रमजीवी संघटनेचे सरपंच निवडून आले. सातशे सदस्य ग्रामपंचायतीत निवडून आले तर जिल्हा परिषदेचे ११ सदस्य निवडून आले आणि तीन पंचायत समितीत सभापती होण्याचा मान संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाला. विवेक पंडित वसई विरार चे आमदार झाले. नंतर त्यांना मंत्र्याचा दर्जा असलेल्या सरकारच्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्षपद मिळाले. या पदाच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींसाठी मोठे काम केले. त्यांच्या ‘समर्थन’ या मानवी हक्क वार्ता पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत ११० पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आला. आता त्यांच्या कन्या स्नेहा दुबे-पंडित वसईच्या आमदार आहेत.
बांबू लागवडीची चळवळ
केवळ तेवढ्यावरच विवेक पंडित थांबले नाहीत, तर पर्यावरणीय बदलाच्या वाढत्या संकटात पालघर जिल्ह्यातील तांडे आणि वाड्यांमधून एक नव्या हरित क्रांतीला त्यांनी सुरुवात केली. बांबू लागवड कार्यक्रमांतर्गत एक कोटी बांबूची झाडे लावण्याची प्रतिज्ञा घेऊन त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांचे हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. शेजारच्या मुंबईला स्वच्छ हवा पुरवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या मोहिमेची सुरुवात पालघरमधील सातीवली आणि वसईमधील उसगाव येथे आयोजित बांबू किसान मेळाव्यातून झाली. त्यात हजारो आदिवासी आणि बांबू उद्पादक सहभागी झाले होते. ही मोहीम पालघर जिल्हा प्रशासन. श्रमजीवी संघटना आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सहकार्याने राबवली जात आहे.
श्रमजीवीमुळे बांबू लागवडीचे सरकारी धोरण
मनरेगाअंतर्गत ही योजना राबवण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या सल्ल्यातून बांबू लागवड ही योजना आकाराला आली आणि आता शेतकऱ्याला या योजनेसाठी अनुदानही मिळायला लागले. विवेक पंडित यांचा पिंड कार्यकर्त्यांचा असल्याने कुठल्याही कामात झालेला गैरव्यवहार आणि निधीचा गैरवापर त्यांना खपत नाही. राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष असताना घेतलेल्या आढावा बैठकीत रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे आढळल्याने त्यांनी थेट शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवली. अशा वेगवेगळ्या माध्यमातून जसे ते काम करतात तसेच अगदी थेट साताऱ्यापर्यंत आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाठवून मुकादमाच्या तावडीत असणाऱ्या आणि वेठबिगारी करायला लावणाऱ्या ऊस तोडणी कामगारांची सुटका ही ते करतात त्यांचे हे काम मोठ असून आता तर त्यांनी आदिवासींच्या जीवनात उत्थान घडवण्यासाठी आपल्या कामाची व्याप्ती वाढवण्याचे ठरवले आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांबरोबरच नाशिक, नगर, धुळे आदी जिल्ह्यामध्येही आपले काम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधींचे तळागाळातील लोकांच्या उद्धाराचे स्वप्न प्रत्यक्षात यावे, म्हणून विवेक पंडित आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.