पालघर-योगेश चांदेकर
उद्या तलासरीत अंत्यसंस्कार
शिक्षण महर्षी आणि लढाऊ नेता हरपल्याची भावना
पालघरः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार आणि लाखो लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या कॉम्रेड लहानु कोम यांचे आज पहाटे निधन झाले. गेली दहा दिवस मृत्यूची संघर्ष करत असताना आज त्यांचा संघर्ष संपला. त्यांच्यामागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात तसेच नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १९५९ पासूनचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच पक्षाचे माजी राज्य सचिव, मंडळ सदस्य अखिल भारतीय किसान सभेचे माजी उपाध्यक्ष अशा विविध पदांवर राहिलेल्या कॉम्रेड लहानू कोम यांना गेल्या दहा दिवसांपूर्वी आजारामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु आज पहाटे त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे थांबवले. त्यातच त्याचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी बारा वाजता तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी परुळेकर भवन या माकपच्या कार्यालयापासून निघणार आहे.
अनेकांचा आधारवड हरपला
कॉ. कोम यांच्या निधनाने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच नव्हे, तर पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज तसेच शिक्षण प्रवाहातील अनेक लोक पोरके झाले आहेत. आ. हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, डहाणूचे आमदार विनोद निकोले, आ. स्नेहा दुबे-पंडित आदींनी त्यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली.
सहा दशकांहून अधिक काळ शिक्षणाची धुरा
लहानू कोम आदिवासी प्रगती मंडळ या शिक्षण संस्थेचे १९६१ पासून आजपर्यंत अध्यक्ष होते. ६३ वर्षाहून अधिक काळ त्यांनी या शिक्षण संस्थेची धुरा वाहिली. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पैशासाठी किंवा अन्य करण्यासाठी शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याबाबत ते अतिशय दक्ष होते. असामान्य लढावू आणि एकनिष्ठ असा हा नेता होता आमदार, खासदार आणि पक्षात विविध पदे बसवूनही साधा राहिला. त्यांच्या या साधेपणाची आणि लढाऊ वृत्तीची अनेकदा चर्चा होत असे.
विचार पेरले
डहाणू परिसरात डाव्या पक्षांचे वर्चस्व असते. तिथला आमदार हा सातत्याने डाव्या विचाराचा असतो. त्याचे कारण या परिसरात कॉम्रेड कोम यांनी डावा विचार अतिशय प्रगल्पपणे आणि खोलवर रुजवला. त्याची परिणिती या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेवर डाव्या विचारचे लोक मोठ्या प्रमाणात निवडून जातात. कॉ. कोम यांनी या मतदारसंघाची वैचारिक बैठक पक्की केली. त्याचबरोबर या भागात विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले. सामान्यांना पदे दिली. कार्यकर्त्यांचा सन्मान केला. त्याचा फायदा नंतरच्या डाव्या लोकप्रतिनिधींना झाला.
युवक असताना मोठी जबाबदारी
आदिवासी प्रगती मंडळ या शिक्षण संस्थेची कॉम्रेड गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, बलराज सहानी यांनी स्थापन केली व आदिवासी समाजात एकमेव मॅट्रिकपर्यंत शिकलेला युवक म्हणजे लहानू शिडवा कोम या युवकांकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली. तेव्हा ते २५ वर्षाचे होते. तळागाळातील आदिवासी समाजाची उन्नती शिक्षणाशिवाय होणार नाही, हे बाळकडू त्यांना गोदावरी व शामराव परुळेकर यांच्याकडून मिळाले होते. परुळेकर दाम्पत्यांच्या समवेत एल. बी. धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. प्रसंगी भूमिगत राहून, तुरुंगावास भोगून दखील त्यांनी आपले कार्य निडरपणे सुरू ठेवले. त्यानंतर ठाणे जिल्हापरिषद सदस्य म्हणून त्यांनी मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाला मजबूत करण्यासाठी केलेले परिश्रम कोणालाही विसरता येणार नाही.
डहाणूतून लोकसभेवर
कॉ. कोम डहाणू लोकसभेची उमेदवारी दिली व १९७७ ते १९८० संसद सदस्य म्हणून निवडून आले. या काळात त्यांची केंद्र सरकारमध्ये अनुसूचित जाती, जमातीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या काळात त्यांना भारतभर सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. १९८१ ते १९८५ पर्यंत जव्हार तलासरी विधानसभा मतदार संघांचे आमदार म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे.
कोट
‘पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वसा घेऊन कॉ. कोम यांनी केलेल्या कार्याने आज हजारो आदिवासी युवक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत. अत्यंत साधी राहणी, प्रखर समाजवादी, गोरगरिबांचे कैवारी, अत्यंत स्वाभिमानी, निस्वार्थी, निस्पृह अशा नेत्याला लाल सलाम!
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर
कोट
‘आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेची स्थापना करून आदिवासी दुर्गम भागामध्ये शिक्षणाचे बीज रोऊन त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करणारे, माझ्यासारख्या असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे द्रष्टा समाजसेवक,समाजरत्न,माजी खासदार,माजी आमदार,शिक्षणमहर्षी,मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे जेष्ठ नेते लहानु कोम भावपूर्ण श्रद्धांजली.
ॲड. काशिनाथ चौधरी, माजी विद्यार्थी,कॉ.गोदावरी शामराव परुळेकर, महाविद्यालय, तलासरी
कोट
-राज्यात तसेच देश पातळीवर कॉ. लहानु कोम यांचे काम मोठे होते. त्यांनी डाव्या विचारांना प्रतिष्ठा दिली. त्यांच्या निधनामुळे डावा विचार पोरका झाला. गोरगरीब आदिवासी बांधवांना शेठ, सावकारांकडून जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी गोदावरी परुळेकर यांच्या लढ्याला त्यांनी दिलेली साथ कधीही विसरता येणार नाही.
कॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्यूरो सदस्य, माकप
कोट
-लहानू कोम यांच्याबरोबर अनेक समित्यांवर मला काम करता आले. त्यांची आदिवासी समाजाच्या उत्थानाची दृष्टी कायम प्रेरणादायी राहिली.
विवेक पंडित, अध्यक्ष, आदिवासी क्षेत्र समाज, समिती
कोट
‘अत्यंत दुर्गम, दुर्लक्षित आदिवासी भागात, अठराविश्व दारिद्र्यात खिचपत पडलेल्या आदिवासी समाजासाठी कॉ. कोम यांनी उघडलेली शिक्षणाची दारे, विद्यार्थांसाठी १९६२ साली वसतिगृहाची केलेली स्थापना या समाजाच्या प्रगतीचा मैलाचा दगड ठरला.
राजेंद्र गावित, आमदार, पालघर