banner 728x90

भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा भरत राजपूत

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

वसई विरार जिल्हाध्यक्षपद प्रज्ञा पाटील यांच्याकडे

भाजपला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा करण्याचा राजपूत यांचा निर्धार

पालघरः भाजपच्या ५८ जिल्हाप्रमुख पदांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपने भाकरी फिरवल्यानंतर आता दुसऱ्या यादीतील २२ पदांपैकी पालघर जिल्ह्यात भाजपच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भरत राजपूत यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या गेल्या दोन वर्षातील कामगिरीची बक्षिस त्यांना पुन्हा मिळाली आहे, तर भाजपच्या वसई विरार जिल्हाध्यक्षपदी आक्रमक नेत्या प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून भाजपला पालघर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष भरत राजपूत यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसापूर्वी भाजपच्या ५८ जिल्हाप्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात पालघर जिल्ह्यातील कोणाचाही समावेश नव्हता. पालघर जिल्ह्यात जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांची नावे शर्यतीत होती; परंतु त्यापैकी कुणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. आता भाजपने राहिलेल्या २२ जिल्हा प्रमुख पदांची नावे जाहीर केली असल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांना नवे पदाधिकारी मिळाले आहेत.

कामामुळे पदाची बक्षिसी
बहुतांश ठिकाणी भाजपने भाकरी फिरवली असली, तरी काही ठिकाणी मात्र पूर्वीच्या जिल्हाध्यक्षांचे काम लक्षात घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. त्यात पालघरमधील भरत राजपूत हे एक प्रमुख नाव आहे. गेल्या दोन वर्षात भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून राजपूत यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. वरिष्ठांशी चांगला संपर्क ठेवला. त्याचबरोबर तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान दिला.

पक्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश
राजपूत यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या काळात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत भाजपला सत्ता मिळाली. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार, जिल्हा परिषद किंवा अन्य संस्था ताब्यात नसतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपला विजय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आणि मित्रपक्षाकडून पालघरची जागा भाजपला सोडवून घेतली. त्या वेळी मित्र पक्षाशी काही प्रमाणात तात्विक वादही घालावा लागला; परंतु पक्षासाठी ही जागा प्रतिष्ठेची करून ती पदरात पाडून घेतली. केवळ तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर डॉ. हेमंत सवरा यांच्या विजयासाठी पुन्हा मित्र पक्षांची व्यवस्थित घडी बसवली. पावणेदोन लाख मतांच्या फरकाने डॉ. सवरा यांना निवडून आणण्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मोठे परिश्रम कारणीभूत ठरले आणि या कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्यामध्ये राजपूत यांचे मोठे योगदान राहिले.

विधानसभेतही करिश्मा
लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही ते स्वस्थ बसले नाहीत, तर पक्षासाठी संघटन करत राहिले. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात पूर्वी विधानसभेला भाजपचा एकही आमदार नसताना त्यांनी पक्षश्रेष्ठींबरोबर सातत्याने संपर्क ठेवून काही जागा भाजपच्या पदरात पाडून घेतल्या. मित्र पक्षाची नाराजी ही पत्करावी लागली; परंतु पक्ष मोठा करण्यासाठी हे सर्व करावे लागते. निवडणुकीच्या काही दिवसअगोदरच पालघर जिल्ह्यात किमान पाच जागा महायुतीच्या निवडून येतील, असे जाहीर केले होते आणि प्रत्यक्षात तसेच झाले. डहाणूची एक जागा वगळता अन्य सर्व जागा भाजप आणि मित्र पक्षांना मिळाल्या. त्यात भाजपचे तीन आमदार प्रथमच पालघर जिल्ह्यातून विधानसभेवर गेले. पक्षाने जिल्हाध्यक्ष निवडताना त्यांच्या या कामगिरीची नक्कीच दखल घेतली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्याबरोबरच पक्षाचे जिल्ह्यातील तीनही आमदार तसेच खासदारांसोबत सातत्याने जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी राजपूत आघाडीवर राहिले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका महानगरपालिकांची निवडणूक विचारात घेऊन राजपूत यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास टाकला आणि तीन जण स्पर्धेत असतानाही पुन्हा एकदा त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले.

आक्रमक महिलेची मुद्दाम निवड
पक्षाने वसई विरार जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या पक्षाच्या आक्रमक नेत्या प्रज्ञा पाटील यांची निवड केली. वसईतील त्या भाजपच्या पहिल्याच महिला जिल्हाध्यक्ष ठरल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडे यांच्याबाबत घडलेल्या राजकीय नाट्याच्या वेळी पाटील यांनी एकाकी खिंड लढवून बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना रोखून धरले. त्याची पक्षाने दखल घेतली आणि त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अशा आक्रमक नेत्यांची आवश्यकता होती. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा महापालिकेत फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केली. पक्षाला जिल्ह्यात नंबर एकचे स्थान मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून देऊ. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून पक्षासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याबरोबरच पक्षात गटबाजी करणाऱ्या आणि काम न करणाऱ्यांना घरी बसवले जाईल.
भरत राजपूत, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, भाजप, पालघर

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!