पालघर-योगेश चांदेकर
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बांबूच्या रोपांचे वाटप
‘सेवा विवेक’ च्या ग्रामविकास प्रकल्पात बांबू उत्पादक आणि कारागीरांचा सत्कार
पालघरः विरार पूर्वेतील ‘सेवा विवेक’च्या ग्रामीण प्रकल्पावर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बांबूच्या रोपे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी बांबू लागवड, उत्पादने व अन्य विविध कार्यक्रम झाले. पालघरला बांबूसमृद्ध जिल्हा करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, ‘हिंदुस्तान प्रकाशन संस्थे’चे कार्यवाह नंदकुमार जोशी, वसईचे प्रांताधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार अविनाश कोष्टी आदी उपस्थित होते.
‘सेवा विवेक’ १४ वर्षांपासून बांबू संवर्धऩात
या वेळी ‘सेवा विवेक’ चे प्रकल्प संचालक प्रदीप गुप्ता यांनी पालघर जिल्ह्यात गेल्या १४ वर्षापासून संस्था करीत असलेल्या कामाचा आढावा घेतला. या काळात संस्थेला मोलाची मदत करणाऱ्या आणि प्रकल्पाला उभारणी देणाऱ्यांच्या बाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बांबू उत्पादक व कारागीर महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बांबूच्या बाराशे झाडांची लागवड करून ती जगून दाखवणारे उमेश गुप्ता, सरपंच दिनेश परेड, सुभाष बोथरे, अऩिता पाटील, शिवाजी खंडारे, संगीता रिजवानी, प्रकाश निकम, प्रवीण राय, अजय केसरवाणी, चंद्रकांत मोदी यांचा त्यात समावेश होता.
‘सेवा विवेक’चे कौतुक
या वेळी बांबू कारागीर महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पालकमंत्र्यासह उपस्थित मान्यवरांनी ‘सेवा विवेक’च्या ग्रामविकासाला चालना देणाऱ्या व महिला सक्षमीकरणाला बळ देण्याच्या कार्याचे कौतुक केले. पालघर जिल्हा आता बांबूसमृद्ध जिल्हा होण्याच्या दृष्टीने पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रगती भोईर, वैशाली दांडेकर यांनी केले. लुकेश बंड यांनी आभार मानले.
कोट
‘पालघर जिल्ह्यात बांबू लागवडीला मोठा वाव आहे. राज्य सरकारने आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले असून त्यासाठी एका खास महामंडळाची स्थापना केली आहे. ‘सेवा विवेक’ प्रकल्प त्याच मार्गावर वाटचाल करीत आहे.
प्रदीप गुप्ता,प्रकल्प संचालक ‘सेवा विवेक’, विरार