पालघर-योगेश चांदेकर
भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचे सूचक विधान
पालघरः भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा भरत राजपूत यांची निवड झाल्यानंतर त्यांचे पदग्रहण झाले. या वेळी पालघर निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हा प्रभारी राणी द्विवेदी, बाबजी काठोळे आदींच्या उपस्थितीत हे पदग्रहण झाले. या वेळी राज्यात महायुती सत्तेत असली, तरी पालघर जिल्ह्यात मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवून यश मिळवेल, असा विश्वास बहुतांश वक्त्यांनी आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
राजपूत यांच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी आमदार नाईक यांनी गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाने पालघर जिल्ह्यात संघटन कसे मजबूत केले आणि त्यामध्ये राजपूत यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचा कसा मोलाचा वाटा होता, हे आवर्जून सांगितले. जिल्ह्यात एकही आमदार, खासदार नसताना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बळावर संघटन करून भाजपचा खासदार आणि तीन आमदार निवडून आणण्यामध्ये भरत राजपूत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. त्याचबरोबर राज्यात जरी महायुतीची सत्ता असली, तरी पालघर जिल्ह्यात मात्र भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुकीची तयारी करत आहोत. पक्षश्रेष्ठी जरी निर्णय घेणार असले, तरी आम्ही जिल्ह्यात भाजपची सत्ता कशी आणायची यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
राजपूत यांच्या संघटनात्मक बांधणीचे कौतुक
या वेळी राणी द्विवेदी यांनी भारतीय जनता पक्षाने पालघर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत केलेल्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख करताना राजपूत यांनी संघटनात्मक बांधणी कशी मजबूत केली, याचा दाखला दिला.
कार्यकर्त्यांच्या जोरावर दिलेला शब्द केला खरा
राजपूत यांनी अतिशय आक्रमकपणे पालघर जिल्ह्यात भाजपचा खासदार नसतानाही ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्याला कशी साथ दिली आणि कोणताही निर्णय पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आपण कसा घेतला, हे उपस्थितांना सांगितले. त्याचबरोबर वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला; पण हे केवळ पक्षासाठी केले आणि त्यामुळे त्याचा फायदा पक्षाला झाला, असे सांगितले. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गेल्या दीड वर्षांपूर्वी आपण पालघर जिल्ह्यात लोकसभेला भाजपचा खासदार असेल आणि विधानसभेत किमान तीन आमदार निवडून जातील, असा विश्वास दिला होता. कार्यकर्त्यांनी अखंड परिश्रम घेऊन हा विश्वास सार्थ ठरवला. गेल्यावर्षी जव्हार येथे झालेल्या कार्यक्रमात हरिश्चंद्र भोये हे पुढच्या वर्षी आमदार झालेले असतील, असे आपण सांगितले होते आणि तेही मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी खरे करून दाखवले, असे त्यांनी सांगितले.
खरी लढाई आता, आडवे येणाऱ्यांना सरळ करू
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण या सर्वांच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे भाजपला पालघर जिल्ह्यात यश मिळवणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. पक्षाला लोकसभा, विधानसभेत यश मिळाले असले, तरी आता खरी लढाई आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक कार्यकर्त्यांची असून, ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभा, विधानसभेत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले, त्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची ही वेळ आहे. त्यामुळे राज्यात महायुती असली, तरी पालघर जिल्ह्यात मात्र आमची सर्व जागा लढवण्याची तयारी आहे. युती झाली की कार्यकर्ता नाउमेद होतो. उमेदवारी मिळेल, की नाही याबाबत त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम आत्ताच दूर करून कोणत्याही परिस्थितीत पालघर जिल्ह्यात भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवून त्या जिंकणार आहे, आडवे येणाऱ्यांना सरळ करू, असा इशारा राजपूत यांनी दिला.
जिल्हा परिषद अध्यक्ष. उपाध्यक्ष भाजपचेच
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद त्याचबरोबर नगरपालिका, नगरपंचायतीची सत्ता भाजप स्वबळावर मिळवणार आहे. आगामी पंधरा वर्षात पालघर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व आमदार हे भाजपचे असतील, असा ठाम विश्वास राजपूत यांनी व्यक्त केला.
‘भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करून मला पुन्हा पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले. आता माझी जबाबदारी वाढली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला जसे यश मिळाले, तसे यश आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचे आहे. पक्ष स्वबळावर निवडणूक लढवायला तयार आहे आणि कार्यकर्त्यांचा ही तो आग्रह आहे. या आग्रहानुसार आमची तयारी सुरू आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पक्षाला युती न करण्याबाबत तयार करू. फार तर निवडणुकीनंतर युती करण्याबाबत विचार करू.
भरत राजपूत, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, भाजप, पालघर