पालघर-योगेश चांदेकर
विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष
पालघरः पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; परंतु त्या तुलनेत वसतिगृहांची संख्या आणि क्षमता ही कमी आहे, याकडे खा. डॉ. हेमंत सवरा यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उइके यांचे लक्ष वेधून आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृह आणि त्यांची क्षमता वाढवण्याची मागणी केली आहे.
याबाबत डॉ. सवरा यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांना पत्र पाठवले आहे पालघर हा आदिवासी लोकवस्तीचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात डहाणू व तलासरी तालुक्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; मात्र जिल्ह्यातील आदिवासी वसतिगृहांची संख्या अत्यंत मर्यादित आहे.
वसतिगृहाअभावी शिक्षण अर्धवट
या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची क्षमता मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. दूरवर जाऊन शिक्षण घेणे शक्य नसल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते, याकडे त्यांनी मंत्री उइके यांचे लक्ष वेधले आहे. पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची क्षमता अतिशय मर्यादित आहे आणि अपुरी आहे.
शिकण्याची वृत्ती वाढली, सुविधा कमी
आदिवासींमध्ये विद्यार्थ्याना शिकविण्याची वृत्ती वाढली असताना वसतिगृहे आणि अन्य सुविधा नसल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने वसतिगृहांची मान्यता घेऊन वसतिगृहाच्या इमारती उभाराव्यात तसेच सध्याच्या वसतिगृहाची क्षमता किमान दोनशे विद्यार्थ्यांपर्यंत करावी, अशी मागणी डॉ. सवरा यांनी मंत्र्याकडे केली आहे. आदिवासी वसतिगृहांची गरज ओळखून आदिवासी विकास विभागाने तातडीने पावले उचलावीत आणि शिक्षणासाठी झगडणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करावीत तसेच त्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
कोट
पालघर हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची संख्या आणि क्षमता वाढवण्याबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांच्याकडे पत्र पाठवले आहे. त्याचा पाठपुरावा मी करणार आहे.
डॉ. हेमंत सवरा, खासदार, पालघर