पालघर-योगेश चांदेकर
पालघरः जमिनीच्या वादाच्या कारणावरून अशोक धोडी यांचे कारसह अपहरण, मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. पालघरवरून थेट गुजरात राज्यातील उमरगांव येथील खाणीत त्याची कार आणि मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला पाच महिन्यांनी अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. अजून तीन आरोपी फरार आहेत. अविनाश हा अशोक यांचा भाऊ असून, त्यानेच खून केल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर पालघर जिल्ह्यातील अशोक धोडी यांचे खून प्रकरण गाजले होते. मुंबईहून परत येत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. वेवजी घाटातील डोंगराच्या वळणावरून त्यांचे अविनाश धोडी व त्याच्या साथीदारांनी कारसह अपहरण केले. त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह सरीगाम, वाडियापाडा (तालुका उमरगाव) येथील खाणीत टाकून दिला.
तीन फरार अजूनही फरार
गेल्या पाच महिन्यांपासून पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी अविनाश धोडी व इतर तीन साथीदार फरार होते. त्यापैकी अविनाशला अटक करण्यासाठी पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मारदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी एक पथक तयार केले होते. या पथकाला योग्य त्या सूचना देऊन आरोपींचा घोलवड, उमरगाव, वापी, दीव-दमण, सेलवासा, इंदूर राजस्थान आदी भागात शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुप्त बातमीदारामार्फत माहिती संकलित केली जात होती. तांत्रिक माहितीचा आधार घेऊन आरोपींच्या ठिकाणाचा शोध घेतला जात होता. अविनाश धोडी याला सेलवासा येथून ताब्यात घेण्यात आले, असले तरी अन्य तीन आरोपी मात्र अजूनही फरार आहेत.
यांचा तपासात मोलाचा वाटा
पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे, डहाणूचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पालघरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत, गोरक्षनाथ राठोड, रोहित खोत, राजेश वाघ, सुनील नलावडे, पोलिस हवालदार दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, भगवान आव्हाड कपिल नेमाडे, विजय ठाकूर, संजय धांगडा, कल्याण केंगार, प्रशांत निकम, विशाल कडव, विशाल नांगरे आदींनी याप्रकरणी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपी अविनाश धोडीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.