गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
त्यातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत (Shiv Sena-MNS alliance) अनेकदा सकारात्मक वक्तव्य केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत देखील संजय राऊत यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत वक्तव्य केले. मात्र, आता वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज सकाळी राज ठाकरे ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही तिथे दाखल झाले. सुरुवातीला दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये येणे हा केवळ योगायोग असावा, अशी चर्चा रंगली होती. तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या अधिकृत दौऱ्यात ताज लँड्स एंड हॉटेलचा कोणताही उल्लेख नव्हता. राज ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरच फडणवीस यांचे तिथे आगमन का झाले? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमध्ये अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा होत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. आता फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, गुरुवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत भाष्य केले होते. शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढेल की मनसेसोबत निवडणूक लढेल? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की. याचं तुम्हाला उत्तर माननीय उद्धव ठाकरे लवकरच देतील. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे या भूमिकेवर बोलतील. आजही महाविकास आघाडी आता एकत्रित काम करते. पण, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय असल्यामुळे स्थानिक लेव्हलला आमच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? कोणाबरोबर जायला पाहिजे? कुठे काँग्रेस बरोबर जावं असं वाटतंय, पुढे राष्ट्रवादीबरोबर भूमिका असावी, असं वाटतंय, मुंबईमध्ये वेगळा निर्णय काही लोकांना घ्यावा, असं वाटतंय, या संदर्भात पूर्ण आमचं काम विचार आणि भूमिका ठरल्यावर लवकरच जाहीर होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या प्रश्नांना लवकरच उत्तर देतील. अगदी सविस्तर, भक्कम आणि परखड आपल्या मनातले सगळे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी उत्तराची तयारी केलेली आहे, असे त्यांनी म्हटले.