राज्यात गेल्या चार दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होण्याची शख्यता आहे. रविवारी कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडला. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. याशिवाय मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात वीजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
रविवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर इथं पावसाने हाहाकार उडाला. मंडणगड इथं राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलं होतं. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.