त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 5 जुलै रोजी संयुक्तपणे मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मात्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र आणि हिंदी भाषा असे दोन्ही निर्णय रद्द केले. याचपार्श्वभूमीवर आता दोन्ही पक्षांकडून विजयी मेळावा काढण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा बंदोबस्त केला. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला का? असा आरोप होताना दिसत आहे. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की, समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना त्यासाठी एकत्र यायचं आहे. पण मी काय दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा जीआर काढला आहे का? असा तर जीआर मी काही काढलेला नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता. तो अहवाल लिहिण्यात उद्धव ठाकरेंचा उजवा हात, त्यांचा जो उपनेता होता, त्याने लिहिलं होतं की, पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला होता. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने घुमजाव केलं. तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही निर्णय केला आहे. आता समिती तयार केलेली नाही. ती समिती ठरवले काय करायचं ते. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू. विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल. कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै रोजी विजयी मोर्चा काढणार आहेत, असं जाहीर केलं आहे. त्या मोर्चाला राज ठाकरे देखील समर्थन देत आहेत. त्यामुळे दोन भाऊ परत एकदा विजयी रॅलीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत, याकडे तुम्ही कसं बघता. असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते दोघे एकत्र येत असतील तर मला आनंद आहे. पण मी कालचं म्हटलं की, राज ठाकरे जो प्रश्न आम्हाला विचारताच, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारायला पाहिजे. तुमच्या काळामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला? हा प्रश्न राज ठाकरे यांनी कधीतरी उद्धव ठाकरे यांना विचारायला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट, हॉकी, टेनिस खेळाव, स्विमिंग करावं किंवा एकत्र जेवावं, आम्हाला काही अडचण नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना आवाहन केलं आहे.