राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज विधानसभेत खडाजंगी झाली.
लोणीकर आणि कृषीमंत्री राज्यातील शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली. यादरम्यान, पटोले यांनी कथित असंसदीय भाषा वापरल्याचा मुद्दा उपस्थित करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले.
सभागृहात नेमकं काय घडलं?
पावसाळी अधिवशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी काँग्रेसचे आमदार नाना पटोले सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले. यावेळी ते म्हणाले, “लोणीकर आणि कृषीमंत्री कोकाटे शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना हा अपमान सहन केला जाणार नाही. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही”, असे पटोले म्हणाले. त्यांनी शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी माफी मागवी, अशी मागणी केली. त्यानंतर विरोधी बाकावरील आमदारांनी ‘शेतकऱ्यांची माफी मागा’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सभागृहात गोंधळ झाला. यावर अध्यक्षांनी पटोले यांना असंसदिय भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत समज दिली. यावर पटोले थेट विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन जाब विचारू लागले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष असताना राजदंडाला स्पर्श केल्यानंतर यासंदर्भातील नियम तयार करण्यात आला होता. त्यामुळे सभागृहाचे पुढील कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित करत आहे.
अध्यक्षांवर धावून जाणे योग्य नाही : फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोले यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळी गोष्ट आहे. पण, अध्यक्षांवर धावून जाणे, जणू अध्यक्षच दोषी आहेत, अशा पद्धतीने वागणे योग्य नाही. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तींनी असे अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे बरोबर नाही. नाना पटोले यांनी माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पटोले यांची तीव्र प्रतिक्रिया : पंतप्रधान कधीपासून शेतकऱ्यांचे तारणहार झाले?
निलंबनानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “भाजपचे आमदार आणि मंत्री सतत सांगतात की नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे तारणहार आहेत. पण खरेच आहेत का? शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान होत आहे, तो पाहता मोदी तारणहार कसे? मोदी सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हेच का कारण होतं त्यांना सत्तेत आणण्याचं?” असा सवाल त्यांनी केला. “शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही,” असे पटोले म्हणाले.