राज्यातील सर्व गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे गणेशोत्स हा राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्स हा राज्याचा महोत्सव असेल, अशी घोषणा विधिमंडळात केली.
भाजप आमदार हेमंत रासणे यांनी याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. त्यावर बोलताना आशिष शेलार यांनी गणेशभक्तांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा लाडके बप्पा १२ दिवस लवकर येणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. गणेशोत्सवाला काही दिवस उरले असतानाच राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली. गणेशोत्स हा महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी विधिमंडळात घोषणा केली. शेलार यांच्या घोषणेनंतर गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आशिष शेलार काय म्हणाले ?
राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात येत आहे. काही लोकांनी वेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा आणली होती. पण या सर्व स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम आम्ही केले आहे, असे आशिष शेलार विधिमंडळात म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयासमोर गणेशोत्सवा बाबत स्पष्ट भूमिका घेतली. पीओपी मूर्ती बाबत निर्बंध हटवले. विसर्जन परंपरागत करण्याचे धोरण आम्ही न्यायालयासमोर मांडत आहोत. राज्य सरकारचे धोरण आडकाठीचे असणार नाही.
100 वर्षाच्या परंपरेला खंडित कोणी केला असेल तर तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केले . लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी घेतली, असा टोला आशिष शेलार यांनी ठाकरेंना लगावला.