अखेर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यामागील कारण त्यांनी कधी समोर आणले नाही.
पण नवीन उमद्या नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यापूर्वी मांडले होते. राष्ट्रवादीतील या ताज्या घडामोडींमुळे पुन्हा नवीन भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली आहे. पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता जयंत पाटील हे पायउतार झाल्याने ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आधीच दिले संकेत, पुढील काय धोरण
राष्ट्रवादी फुटल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा होती. आपल्याला आता या जबाबदारीतून मुक्त करावे असे त्यांनी यापूर्वी पक्षाच्या कार्यक्रमात अनेकदा भावना व्यक्त केली होती. तर नुकताच 10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम झाला. त्यावेळी मला पक्षाने आणि शरद पवार यांनी बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालवधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. सर्वांदेखत त्यांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, अशा भावना त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या. आता पुढे जयंत पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात माळ
शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव पुढे आले. त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी गेल्यावेळी जयंत पाटील यांनी केली होती.
शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
शशिकांत शिंदे यांनी या घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 15 तारखेला पक्षाची बैठक होत आहे. काही नावांसोबत माझ्या नावाची चर्चा आहे. तुमच्या माध्यमातून माझ्या निवडीचे वृत्त कळाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पद ज्याला मिळेल हे त्याचे भाग्य असेल असे मला वाटतं, असे शिंदे म्हणाले. तर जयंत पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाने सर्व आव्हानांना तोंड दिले. लोकसभा, विधानसभा निवडणुका त्यांच्या कार्यकुशलतेत लढवल्या गेल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले. 15 जुलै रोजी बैठक होणार आहे. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी नाही तर विचारपूर्वक राजीनामा दिला असे मला वाटते, असे शिंदे म्हणाले.
जयंत पाटील अस्वस्थ नव्हते
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याबाबत मला माध्यमांकडून माहिती समजली. प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव समोर येतं याबाबत मला कोणतीही माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा सर्वस्वी अधिकार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे. पक्षात कोणती जबाबदारी मिळो न मिळो मात्र पक्षासाठी काम करणं अत्यंत गरजेचे आहे. अडचणीच्या काळात पक्ष वाढीसाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते पक्षात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी दिली.