मराठा समाजाला ओबीसीसून आरक्षण द्यावे, ही मागणी २९ ऑगस्टपूर्वी मान्य केली नाही तर मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ‘चलो मुंबई’चा नारा दिला.
त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाची येथील शिवछत्रपती महाविद्यालयात रविवारी (ता. २०) नियोजन बैठक झाली. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली. शहरातून किती वाहने जाणार, सोयी-सुविधा काय असणार याचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला दोनशेवर समाजबांधवांची उपस्थिती होती. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने जाणाऱ्या समाजबांधवांसाठी लवकरच तिकीट बुकिंग करण्यात येईल.
महत्त्वाचे म्हणजे, मुंबईला जाणाऱ्या समाजबांधवांना त्यांचा एकही रुपया खर्च करू द्यायचा नाही, तर त्यांच्या जाण्याचा खर्च मुंबईची ओढ असणाऱ्या; परंतु कामामुळे येऊ न शकणारे समाजबांधव उचलणार असल्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरातून ५१ जणांनी चारचाकी वाहन देण्याचे जाहीर केले. याशिवाय रांजणगाव शेणपुंजी भागातून दोन आयशर ट्रक देण्यात येणार आहेत. मिळेल त्या साधनाने मुंबईला पोचण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आता माघार नाही
आरक्षणासाठी मुंबईत कितीही दिवस राहावे लागले तरी चालेल. पण, आरक्षण घेतल्याशिवाय परत न येण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. महिनाभर राहण्याच्या तयारीने समाजबांधव जाणार आहेत, सोबत शिधा, पाणी यासाठी विशेष वाहने असणार आहेत. प्रवासात शिस्त पाळण्यात येणार आहे.
एक हजारावर दुचाकींची फेरी
मुंबईला जाण्याअगोदर शहरात छोटे-छोटे फलक असलेली फेरी काढण्यात येईल. यामध्ये एक हजारावर दुचाकी, शंभरावर चारचाकी वाहने सहभागी होतील. या फेरीची तारीख आणि मार्ग काही दिवस अगोदर ठरविण्यात येईल. शांततेत निघणारी फेरी शांततेत विसर्जित होईल. शहरात फिरत्या रिक्षांद्वारे प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील प्रत्येक वॉर्डात बैठका घेण्यात येणार आहेत, असाही ठराव यावेळी घेण्यात आला.
















