विधानसभेचे कामकाज सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला होता. त्यावरुन महायुती सरकारवर टीकेची झोड उडाली.
विरोधकांकडून टीकेची झोड उडाल्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या एक दोन दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यांच्याकडे असलेले कृषी खाते हे मकरंद पाटील यांच्याकडे सोपवण्यात येऊ शकते. तर कोकाटे यांना मदत व पुनर्वसन खातं मिळू शकते. कोकाटे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या आरोपामुळे हा निर्णय होऊ शकतो
विधानसभेत रमी खेळत असूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत, त्यांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी टीका केली. सीबीाय, सीआयडी किंवा इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी माणिकराव कोकाटे हे पत्तेच खेळत होते हे सत्य बदलणार नाही असेही ते म्हणाले.
आपण पत्ते खेळत नव्हतो तर यूट्यूबरची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव माणिकराव कोकाटे यांनी केली. वरिष्ठ सभागृहात सुरू असलेले कामकाज आपण यूट्यूबवर पाहत होतो, त्यावेळी ती जाहिरात आल्याची सारवासारव कोकाटे यांनी केली.
माणिकराव कोकाटे यांनी सारवासारव केली असली तरी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ते पत्ते खेळत असल्याचे दिसून येत आहे. नेमकं याचवरुन रोहित पवार यांनी त्यांच्यावर आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल.’