महायुती सरकारमधील काही वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. या वादग्रस्त नेत्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे त्यांना फडणवीस लवकरच नारळ देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये राज्यातील 8 मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची बातमी दिली आहे. या बातमीमुळे राज्यातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असून त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे या चर्चांना आणखी जोर आला आहे.
दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? या चर्चांवर आता खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष बदलायचा की नाही हे पक्ष बघेल.
पक्षाची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा असेल. अध्यक्षपद मंत्रिपदापेक्षा मोठं आहे. पद गेलं तर आनंद कसा होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय तुमच्या आशीर्वादाने नवीन जबाबदारी मिळत असेल तर आनंदच होईल. माझा पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी स्विकारायला तयार आहे.
विधानसभा अध्यक्ष असो वा मंत्री शेवटी जनतेसाठीच काम करायचं आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून मी क्रांतिकारक निर्णय घेतलेत अधिवेशनामध्ये 152 लक्षवेधी मांडल्याचं सांगायला ते यावेळी विसरले नाहीत. तसंच मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीने काम करतोय. इतर जबाबदारी मिळाली तर ती सुद्धा पार पाडू.”
तर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य मंत्रिमंडळात असा कोणताही फेरबदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय याबाबतची कोणतीही चर्चा कोअर ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रिमंडळाबाबतचा कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही तो केंद्रीय स्तरावर होतो.
अशा प्रकारच्या काही बदल होणार असेल तर तो वेळेवर कळतो. पण सध्या असा काही बदल होईल, असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. कारण पुढे स्थानिकच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.