banner 728x90

दोन दिवसांच्या मुसळधारांमुळे पावसाच्या सरासरीत वाढ…

banner 468x60

Share This:

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसाच्या सरासरीत काहीशी वाढ झाली आहे. विशेषत: पश्चिम आणि मध्य उपनगरांत पावसाची नोंद झाली असून, हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात १ ते २५ जुलैपर्यंत ६६३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे.

मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस सक्रिय झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपसून पावसाने ओढ दिली होती. हवामान विभागाच्या दोन्ही केंद्रात १ ते १५ जुलैपर्यंत साधारण १०० ते २०० मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईत २० जुलैच्या आसपास पाऊस पडायला पुन्हा सुरुवात झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात २१ जुलै रोजी ११४.६ मिमी, २२ जुलै रोजी १०७.६ मिमी पावसाची नोंद झाली.

सलग दोन दिवस सांताक्रूझ केंद्रात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सरासरीत काहीशी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २५ जुलैदरम्यान ३३२.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६६३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात कुलाबा येथे ७७४.१ मिमी, तर सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी पाऊस अपेक्षित आहे. दोन्ही केंद्रांवरील आतापर्यंतची नोंद लक्षात घेता जुलै महिन्याची सरासरी पावसाला गाठता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारण सुरुवातीचे १५ दिवस मुंबईत फारसा पाऊस पडलेला नाही.

शुक्रवारी पहाटेपासून संततधार

मुंबई शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. वरळी, दादर, भायखळा, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला या भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करावा लागला होता. पाण्याचा निचरा झाल्यानंतर सब वे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

सरासरी गाठण्यासाठी ‘इतक्या’ पावसाची गरज

जुलै महिन्यात दोन्ही केंद्रावर मिळून १५८९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा १ ते २५ जुलैदरम्यान दोन्ही केंद्रांवर मिळून ९९५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याची सरासरी गाठण्यासाठी अजून ५९४ मिमी पावसाची आवश्यकता आहे. जून महिन्यातही शेवटच्या दोन – तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठता आली आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक

गतवर्षी दोन्ही केंद्रावर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जुलै २०२४ मध्ये १४०१.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १७०२.८ मिमी पावसाची नोंद झाली होती.

मे महिन्यात सर्वाधिक

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस, त्यातर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मेदरम्यान, २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!