पावसाळी अधिवेशनात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी आणि डान्स बार प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर अनिल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
दरम्यान, अनिल परब यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तथ्य असल्यास चौकशी करू असं उत्तर दिल आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत जाऊन कदम यांची पाठराखण करत “योगेश, तू चिंता करू नको, हा एकनाथ शिंदे आणि अख्खी शिवसेना तुझ्या पाठीशी आहे,” असा शब्द दिला आहे. त्यामुळे आता हा वाद शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे.
काय आहे ‘सावली’ बार प्रकरण?
कांदिवली येथील ‘सावली’ हॉटेल आणि बार हा योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर आहे. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मालकीचा हा बार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या बारवर छापा टाकून 22 बारबाला आणि 22 ग्राहकांना ताब्यात घेतले होते.
पोलीस पंचनाम्यात याला डान्स बार असे स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र, रामदास कदम यांनी हा डान्स बार नसून फक्त बार-रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी हॉटेल एका शेट्टी नावाच्या व्यक्तीला चालवण्यासाठी दिल्याचे सांगितले. तरीही, “गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्स बार कसा चालतो?” असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित करत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळले
या प्रकरणाने महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. अनिल परब यांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आरोपांमध्ये तथ्य असल्यास चौकशी केली जाईल,” असे सांगितले. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट रत्नागिरीत जाऊन योगेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, “योगेश कदम हा काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर खोटे आरोप केले गेले आहेत. जे चोर आहेत, तेच दुसऱ्यांना चोर म्हणतात.” शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, “आरोप करणाऱ्यांनी स्वतः काय केले, याचे उत्तर द्यावे,” असे आव्हान दिले. शिंदे यांच्या या पाठिंब्याने योगेश कदम यांचे मंत्रिपद सध्या तरी सुरक्षित दिसते, परंतु फडणवीस यांच्या चौकशीच्या आदेशामुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
राज्यात डान्स बारवर बंदी, तरीही बार कसा चालतो?
शिवसेना (UBT) नेते अनिल परब यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा जोरदारपणे मांडला. “राज्यात डान्स बारवर बंदी असताना गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा बार कसा चालतो?” असा सवाल त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ‘सावली’ बारची पाहणी करत कदम यांच्यावर टीका केली.