पालघर-योगेश चांदेकर
शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम
पालघरः पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पाच आश्रमशाळा राज्य सरकारने बंद केल्या. या आश्रमशाळा पुन्हा सुरू करण्यासाठी आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. खर्डी (ता.वसई) येथे कातकरी विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेल्या आश्रमशाळेला जागा नसल्यामुळे ती डहाणू तालुक्यातील रानशेत येथे सुरू करण्यात आली आहे.
या शाळेचे उद्घाटन विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. एकीकडे राज्यात आदिवासी, कातकरी समाज शिक्षणापासून वंचित असताना दुसरीकडे आदिवासींसाठी असलेल्या आश्रमशाळा बंद होत आहेत. राज्य सरकारने पाच आश्रमशाळा बंद केल्यानंतर पंडित यांनी तातडीने हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानी घालून या शाळा सुरू करण्याची मागणी केली आणि ज्या भागात कातकरी समाजाची संख्या जास्त आहे, अशा भागात या शाळा सुरू कराव्यात, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. राज्याचे आदिवासी आयुक्त गोपीचंद कदम यांनाही त्यांनी साकडे घातले. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून, त्यातील पहिली शाळा रानशेत येथे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या गावातील नर्सिंग कॉलेजची इमारत भाड्याने घेऊन सुरू करण्यात आली आहे
शिक्षणाचे प्रमाण अवघे दहा टक्के
या वेळी पालघर मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित, आदिवासीविकास विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, कातकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश सवरा, आदिवासी विभागाचे डहाणूचे अधिकारी विशाल खत्री आदी उपस्थित होते. कातकरी समाजाची लोकसंख्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात अधिक आहे; परंतु हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. साक्षरतेचे प्रमाण या समाजात फक्त दहा टक्के आहे आणि महिला तर अवघ्या दोन टक्के सुशिक्षित आहेत. कातकरी समाजातील मुलांना गावाकडे ठेवून या समाजातील लोक ऊस तोडणी, कोळसा, वीट भट्टी तसेच अन्य ठिकाणच्या कामावर जात असतात. मुले पाठीमागे वेठबिगारीसारखे काम करत असतात ही गंभीर बाब पंडित यांनी निदर्शनास आणून कातकरी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्याची मागणी केली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. आता रायगड जिल्ह्यासाठी दोन आणि पालघर जिल्ह्यासाठी आणखी आश्रमशाळा मंजूर होणार आहेत त्यातील पहिली शाळा रानशेत येथे सुरू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सेंट्रल कीचनमधून जेवण
या शाळेत पहिल्या इयत्तेत दहा तर पाचव्या इयत्तेत २५ विद्यार्थी दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था सेंट्रल कीचनमधून करण्यात आली आहे. ही शाळा सुरू झाल्याने आता तेथे प्राधान्याने कातकरी समाजातील मुलांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंडित यांनी ही भूमिका जाहीर केली. पहिली ते दहावीचे अन्य वर्ग तसेच महाविद्यालयीन शिक्षणही या भागात सुरू करून कातकरी समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगितले.
मुलांना आश्रमशाळेत आणण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर
कातकरी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी केवळ आदिवासी विभागाचीच नाही, तर ती जिल्हा परिषद आणि ग्रामविकास विभागाची आहे, म्हणून कातकरी समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी ही जबाबदारी ग्रामसेवकांवर टाकण्यात यावी आणि जे ग्रामसेवक ही जबाबदारी पार पाडणार नाहीत किंवा त्यांच्या भागात कातकरी मुले शिक्षणापासून वंचित राहतील, त्या ग्रामसेवकांना त्यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे पत्र देण्याबाबत पंडित यांनी आदिवासी विभागाला सूचना केल्या.
गावितांकडून पंडित यांचे कौतुक
या वेळी आमदार राजेंद्र गावित यांनी कातकरी समाजाचे मुलांचे शिक्षण आणि त्यासाठी पंडित यांनी केलेल्या प्रयत्नांची तोंड भरून स्तुती केली.
कोट
‘राज्यात ठराविक जिल्ह्यात कातकरी समाजाची संख्या जास्त असून हा समाज शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अप्रगत आहे. या समाजातील मुलांना शिकवून त्यांना मोठे करण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्य सरकारचेही त्यासाठी सकारात्मक सहकार्य मिळत आहे.
विवेक पंडित, अध्यक्ष, आदिवासी आढावा समिती
कोट
‘पालघर, ठाणे आणि डहाणू तसेच रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कातकरी समाज आहे. वाडा तालुक्यात या समाजाचे प्रमाण मोठे आहे; परंतु हा समाज शैक्षणिकदृष्ट्या अप्रगत आहे. या समाजातील मुले शिकली पाहिजेत, अशी भूमिका घेऊन विवेक पंडित यांनी जे प्रयत्न सुरू केले आहेत, ते निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आमची मोलाची साथ मिळेल
राजेंद्र गावित, आमदार, पालघर