मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने जाहीर केला. या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर 101 जण जखमी झाले होते.
तब्बल 17 वर्षांनंतर विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या निकालावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसच्या ‘भगवा दहशतवाद’ संकल्पनेवर जोरदार हल्ला चढवला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर आपल्या ‘एक्स’ खात्यावरून प्रतिक्रिया देताना म्हटले, “दहशतवाद ना कधी भगवा होता, ना आहे, ना कधी असेल. त्यांनी काँग्रेसवर टीका करत ‘भगवा दहशतवाद’ ही संकल्पना राजकीय हेतूने रचल्याचा आरोप केला.
एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना निकालाचे स्वागत केले, पण न्यायाला उशीर झाल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “2008 मध्ये युपीए सरकारच्या काळात मालेगाव स्फोट झाला तेव्हा त्यांनी ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग करून हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या निकालाने त्या राजकारणाला कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे.” शिंदे पुढे म्हणाले, “हिंदू सहिष्णू आहे, तो देशविरोधी कृत्ये करू शकत नाही. या निकालाने हे सिद्ध झाले आहे.”