banner 728x90

बदलापूरमध्ये बुधवारी पाणी बंद; तातडीच्या दुरुस्तीसाठी बंद, नागरिक हतबल

banner 468x60

Share This:

आधीच आठवड्यातून एक दिवस चक्राकार पद्धतीने पाणी कपात सहन करणाऱ्या बदलापूरकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. बुधवारी (दि. १३ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत बदलापूर पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

मुख्य जलवाहिनीवरील तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी आठवड्याच्या पाणी कपातीच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.

आधीच शहरात चक्राकार पद्धतीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जात आहे. त्यात आता अतिरिक्त बंदीचा दिवस आल्याने नागरिकांना दोन दिवस सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. यामुळे शहरातील असंतोष अधिकच वाढला आहे. बदलापूरमध्ये सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. विजेच्या अडचणीमुळे पाणी वितरण व्यवस्था ठप्प होते, त्यातच आता देखभाल-दुरुस्तीचे काम नागरिकांच्या डोकेदुखीत भर घालणार आहे.

बदलापुरातील पाणीपुरवठा व्यवस्था जुनाट अवस्थेत असून, गळती, गाळ साचणे आणि पंपिंगसंबंधी अडचणी या नेहमीच्या झाल्या आहेत. उल्हास नदी भरून वाहत असली तरी गाळवाढीमुळे पाणी उपसा करण्यास अडचणी येतात. परिणामी पाणी मुबलक स्रोत असूनही नागरिकांना आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होत नाही.

हेही वाचाउल्हासनगरच्या पुनर्विकासाला गती मिळणार; प्रलंबित प्रकरणांसह नव्या प्रकरणांसाठी नवी कार्यपद्धतीसाठी हालचाली…

दरम्यान, गणपती उत्सव जवळ आला आहे. सणासुदीच्या तयारीसाठी घरगुती स्वच्छता, रंगकाम, सजावट यासाठी पाणी आणि वीज या दोन्हींची आवश्यकता असते. मात्र विजेचा “खेळ खंडोबा” सुरूच असल्याने पाणी वितरण व्यवस्थाही ढासळते. त्यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, प्राधिकरणाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवाशांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, पाणीपुरवठा बंदीची माहिती वेळेत देऊन, गणपतीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

समस्यांचा डोंगर

बदलापूर शहरात ग्रामीण भागापेक्षा भीषण प्राथमिक समस्यांनी डोके वर काढले आहे. त्यातून बदलापूरकरांची सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून बदलापूर शहरात विशेषतः बदलापूर पूर्व भागात विजेचा सातत्याने खेळखंडोबा होतो आहे. सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला आहे फटका बसतो आहे. सातत्याने बंद पडणारी जलशुद्धीकरण केंद्र यंत्रणा सुरू होण्यास मोठा वेळ जातो. परिणामी दिवसभराचे पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडते आहे. गाळ वाढत असल्याने पाणी उचल क्षमता कमी झाली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याबाबतचा खुलासा केला होता. बदलापुरातून जाणारा बडोदे महामार्ग उभारणी वेळी झालेल्या खोदकाम आणि माती भरावामुळे जलवाहिन्यांमध्ये माती शिरल्याचे प्राधिकरणाने कबूल केले होते. त्यामुळे जलवाहिन्यांची वहन क्षमता 20 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात कमी झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले होते. अशा समस्यांमुळे बदलापूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!