मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज आणि वांद्रे येथे आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
पावसाचा वेग सध्या मध्यम असल्याने सखल भागात पाणी साचल्याची नोंद नाही. मात्र मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या काही मिनिटे उशिराने धावत असून रस्ते वाहतुकीवर विशेष परिणाम झालेला नाही.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव आणि गडचिरोली येथे आज पाऊस पडू शकतो.
13 ते 15 ऑगस्टदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात 14 व 15 ऑगस्टला पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला असून, पुढील काही तास शहराच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

















