नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली जाणार आहे. नागपूरसह राज्यभरात ही तलवार नेण्यात येईल आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रभादेवीतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत सोमवारी पार पडला. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, रघुजीराजे यांचे वंशज मुधोजी राजे भोसले, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, संचालक मीनल जोगळेकर, संचालक डॉ.तेजस गर्गे आदी उपस्थित होते.
नागपूरच्या भोसल्यांचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास असून, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याची गरज असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, युनेस्कोचे १२ किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे, अशा विविध ऐतिहासिक वारशांद्वारे आपण आपल्या इतिहासाशी पुन्हा जोडले जात आहोत. हा दैदिप्यमान इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोचविण्याचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऐतिहासिक वस्तू परत मिळविण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर इंग्रजांच्या काळात लुटून नेलेल्या आपल्या ऐतिहासिक वस्तू व बहुमूल्य वारसा चिन्हे परत आणण्याचा राज्य शासनही निश्चितपणे प्रयत्न करील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक – ॲड.आशिष शेलार
इंग्रजांच्या काळात लुटून नेलेल्या आपल्याच शौर्याच्या, पराक्रमाच्या, मराठा साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारी प्रथम रघुजी राजे भोसले यांची तलवार अखेर महाराष्ट्रात परत आली आहे. ही केवळ एक वस्तू नाही, तर आपल्या पिढ्यांना प्रेरणा देणारे स्वराज्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन शेलार यांनी यावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर उभे राहून रघुजी राजे भोसले यांनी मराठा साम्राज्य बंगालपासून ओडिसा, तेलंगणापर्यंत विस्तारले, याची आठवण करून देवून शेलार म्हणाले, ही तलवार परत मिळविणे म्हणजे केवळ शौर्याचे पुनरागमन नाही, तर सांस्कृतिक पुनर्जन्म आहे. उद्याच्या पिढ्यांना ती प्रेरणा देणारी ठरणार आहे.
छत्रपतींच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवून देणे किंवा रघुजी राजे भोसले यांची तलवार परत आणणे, हीच खरी ‘विरासत से विकास तक’ची संकल्पना आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, शौर्य आणि गणेशोत्सवासारखे उत्सव जागतिक पातळीवर पोचविणे हा आमचा संकल्प आहे.यावेळी श्रीमंत रघुजी राजे भोसले यांचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ मराठ्यांचा दरारा ‘ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
नवीन पिढीला इतिहासाशी जोडण्याचे कार्य सुरू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Read Also
Recommendation for You

Post Views : 173 मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका…