गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.
या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या?
मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथे राहणारे कोकणवासीय आपल्या गावी जातात. त्यामुळे या भागातील शाळांना नेहमी ५ दिवसांची सुट्टी असते. पण यंदा गौरी-गणपती विसर्जन ७ दिवसांनी होत असल्यामुळे मुंबई आणि कोकणातील सरकारी शाळांना ७ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. गौरींचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी, पूजा १ सप्टेंबरला आणि गौरी-गणपती विसर्जन २ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये गौरी येतात, तेथे बाप्पाचे विसर्जन ७ दिवसांनी केले जाते, म्हणून सुट्ट्यांमध्ये वाढ झाली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना मात्र ५ दिवसांची सुट्टी मिळू शकते.
इतर ठिकाणी किती दिवसांची सुट्टी?
मुंबई आणि कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शाळांना खालीलप्रमाणे सुट्ट्या मिळतील.
२७ ऑगस्ट: गणेश चतुर्थी
१ सप्टेंबर: गौराई पूजन
५ सप्टेंबर: ईद-ए-मिलाद
६ सप्टेंबर: गणेश विसर्जन
ज्या शाळांना शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे, त्यांना या ४ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये २ शनिवार आणि २ रविवार जोडून एकूण ८ दिवसांची सुट्टी मिळू शकते.
एकूण ९ दिवसांची सुट्टी
काही शाळांमध्ये ११ दिवसांच्या उत्सवासाठी विद्यार्थ्यांना तब्बल ९ दिवसांची सुट्टी मिळू शकते. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत सलग ७ दिवस सुट्टी असेल. त्यानंतर, ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद, ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि ७ सप्टेंबरला रविवार असल्यामुळे एकूण ९ दिवसांची सुट्टी मिळेल. ज्या शाळांना ५ दिवसांची सुट्टी असेल, त्यांना ईद-ए-मिलाद, गणेश विसर्जन आणि रविवार मिळून एकूण ८ दिवसांची सुट्टी मिळू शकते.
कॉलेजेसना सुद्धा स्थानिक पातळीवर साधारणपणे ७ ते ८ दिवसांची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना भरपूर सुट्ट्या मिळाल्याने त्यांच्या उत्साहात भर पडली आहे.