सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) अभ्यासकेंद्र गेल्या सात वर्षांपासून शैक्षणिक उत्कृष्टतेचा नवा आदर्श प्रस्थापित करत आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात केंद्रामध्ये ३५७६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, ही संख्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, मुंबई विभागीय केंद्राचे संचालक डॉ. वामन नाखले, आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच विशेष पारितोषिक देऊन अभ्यासकेंद्राचा गौरव करण्यात आला.
डॉ. प्रकाश देशमुख यांनी यावेळी सांगितले, “सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील अभ्यासकेंद्र हे महाराष्ट्रातील पथदर्शी केंद्र ठरत असून, विविध नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्याभिमुख उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण सेवा पुरवते. विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्याचे कार्य हे केंद्र प्रभावीपणे करत आहे.” या यशामागे प्राचार्य व केंद्रप्रमुख डॉ. किरण सावे यांचे दूरदर्शी नेतृत्व, केंद्र संयोजक डॉ. बाळासाहेब रहाणे, केंद्र सहाय्यक प्रा. निलेश पाटील यांचे समर्पित कार्य आणि संपूर्ण कार्यकारी संघाचा परिश्रम आहे. हे अभ्यासकेंद्र अत्यंत नियोजनबद्ध व कार्यक्षम पद्धतीने विविध शैक्षणिक योजना राबवत आहे.
या कार्याबद्दल सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, सचिव श्री. सुधीर कुलकर्णी, श्री. अनिल पाटील, आणि खजिनदार श्री. मंगेश पंडित यांनी अभ्यासकेंद्राचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देवून ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित घटकांनी YCMOU सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रात प्रवेश घेवून आपले उच्च शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन केले.