राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला असून अनेक नेते, पदाधिकारी महायुतीत पक्षप्रवेश करताना दिसत आहेत.
काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्ष सोडणाऱ्याविषयी एक विधान केल आहे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली पाहिजे, काम करा पुन्हा काँग्रेसचे दिवस येणार आहेत असं थोरात म्हणाले.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची आढावा बैठक छत्रपती संभाजी नगर येथे पार पडली. यावेळी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर चव्हाण, आमदार अमित देशमुख, आमदार डॉ. विश्वजीत कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, राजेश राठोड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर , शहराध्यक्ष युसुफ शेख आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेले घोटाळे राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केले आहेत. देशातील लोकशाही धोक्यात असून, ती वाचवण्याची गरज आहे आणि राहुल गांधी हे त्यासाठी लढत आहेत, या लढाईत देशातील सर्व विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहेत. राज्य सरकारमध्येही तिघांत वाद सुरु आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत. केंद्र व राज्य सरकारचा हा गैर कारभार जनतेपर्यंत पोहचवला पाहिजे. राज्यघटना व लोकशाही कशी धोक्यात आली आहे हे जनतेला सांगितले पाहिजे. पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, नवीन पालवी फुटली पाहिजे, काम करा पुन्हा काँग्रेसचे दिवस येणार आहेत असे थोरात म्हणाले.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यावेळी म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात नारा दिला आहे, ‘वोट चोर, गद्दी छोड’, त्याला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस रस्त्यावर उतरेल हा संकल्प आज करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सरकारच्या कामाचा पर्दाफाश करण्याचा निश्चयही करण्यात आला आहे. अत्याचारी महायुती सरकारला या निवडणुकीत धडा शिकवला पाहिजे यावरही चर्चा झाली. महायुती सरकारने मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती अजून झालेली नसून मराठवाड्याचे मागासलेपण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. देशात व राज्यात लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या सरकारला वेळीच धडा शिकवला पाहिजे. आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसचा तिरंगा फडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही देशमुख म्हणाले..