डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही. सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे. जेव्हा सरकार सहकार्य करणार नव्हते असे वातावरण होते, तेव्हा आपण मुंबईत येऊन मुंबई जाम करणार होतो.
मात्र आपल्याला सरकारने परवानगी दिली आहे.
सरकारने सहकार्य केले. आता आपल्यालाही सरकारला सहकार्य करायचे आहे. आरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही सहकार्य करायचे आहे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी केले.
आझाद मैदानात पोहोचल्या बरोबर हजारोच्या संख्येने जमलेल्या भगव्या वादळाला मनोज जरांगे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी येथे आलो आहोत.
शांततेत रहा, गडबड गोंधळ करून नुकसान करून घेऊ नका, असे त्यांनी सांगितले. सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मराठ्यांना मुंबईत यावे लागले.
आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता हटणार नाही. सरकारने बेमुदत उपोषण करू द्यावे, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी करत दोन वर्षांपूर्वी २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले होते. त्यानंतर आज मुंबईतले हे आठवे उपोषण आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आंदोलनाला १ दिवसांची मुदतवाढ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.