पालघर-योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यात केंद्र सरकारच्या अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेतील धान्य वितरणात मोठे घोटाळे होत असून गोरगरिबांना दर महिन्याला मिळणाऱ्या धान्यात हजारो क्विंटल घट दाखवून परस्पर धान्य विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी एक मोठी साखळी कार्यरत असल्याचे बोलले जात असून याबाबतचे पुरावे ‘लक्षवेधी’च्या हाती लागले असल्याने ही माहिती समजताच पुरवठा विभागाचे धाबे दणाणले आहेत.
कोरोना नंतर केंद्र सरकारने अन्नसुरक्षा योजने अंतर्गत मोफत धान्य वितरण सुरू केले. त्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अशा दोन योजनांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने भिवंडी आणि बोरिवली इथून धान्य पाठवले जाते. बोरिवली आणि भिवंडीच्या गोदामापासून डहाणूच्या गोदामापर्यंत धान्य येताना त्याच्या नोंदी ठेवणे अपेक्षित असते. गोदामातून ट्रक भरून निघताना त्याचे वजन केले जाते, त्यात किती गोणी आहेत आणि किती क्विंटल धान्य आहे, याचा तपशील द्यावा लागतो

गोणीमधील धान्यातील वजनात हेराफेरी
बोरिवली आणि भिवंडीमधून येणाऱ्या ट्रकमधील धान्यात वजनात घट येत असून असे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. हा प्रकार एकट्या डहाणू तालुक्यात नव्हे, तर पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सुरू आहे तसेच शासकीय गोदामात आल्यानंतर धान्य भिवंडी आणि बोरिवली येथून पाठवले, तेवढेच आहे असे दाखवले जाते.यामध्ये ट्रक चालक आणि गोदामातील कर्मचाऱ्यांचे संगनमत असते. त्यात घट असलेल्या गोणीतील धान्याचे काही पैसे ट्रक चालक स्वतःकडे ठेवतो, तर काही पैसे गोदाम कर्मचारी यांला दिले जातात. असाच गोदाम कर्मचारी याला ट्रक चालक पैसे देत असतानाचा धक्कादायक पुरावा ‘लक्षवेधीच्या हाती लागला आहे.
कागदोपत्री धान्य जास्त, प्रत्यक्षात पुरवठा कमी
गोदाम कर्मचारी आणि ट्रक चालकाच्या कटात काही माथाडी कामगार सहभागी असल्याचा आरोप या प्रकरणातील लोक करतात. भिवंडी आणि बोरिवली येथील गोदामात धान्याची प्रत्येक गोण पन्नास किलो पाचशे ग्रॅमची असते; परंतु प्रत्यक्षात जेव्हा ती गोण गोदामात पोहोचते, तेव्हा गोणीतील धान्यात २०० ग्रॅम ते ५०० ग्रॅम पासून तीन ते चार किलोपर्यंत घट तयार केली जाते. अनेकदा गोणीला हूक लागणे किंवा गोणी उंदराने कुरतडलेले असणे, फाटकी असणे अशा प्रकारामुळे धान्य मध्येच गळून पडणे याचे कारण पुढे करत धान्यातील वजनात अफरातफर करून गोरगरिबांना मिळणाऱ्या धान्यावर पुरवठा विभातील कर्मचारी डल्ला मारत आहेत?

स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारींना केराची टोपली
भिवंडी आणि बोरिवलीच्या गोदामातून आलेले धान्य तालुक्यातील शासकीय गोदामत येते. तिथून ते डहाणू तालुक्यात असलेल्या २०७ रास्त भाव दुकानांना पाठवले जाते, तेव्हा ते धान्य कमी आढळून येते. रास्त भाव दुकानदारांच्या संघटनांनी यापूर्वी पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही आणि ही मोठी घट भरून काढण्यासाठी आम्हाला शिधापत्रिकाधारकांना कमी कमी वजनात धान्य देऊन तूट भरून काढावी लागते अशी धक्कादायक माहिती एका रास्त भाव दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. गोदामातूनच रास्त धान्य दुकानदारांना कमी धान्य मिळत असल्याने मग रास्त भाव दुकानदार ही लाभार्थींना कमी धान्य देतो. अंत्योदय धान्य योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनातील धान्य मोफत असल्याने धान्य कमी मिळत असले, तरी लाभार्थी तक्रारी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्याचा गैरफायदा गोदाम कर्मचारी रास्त भाव दुकानदार यांच्यासह पुरवठा यंत्रणा घेत असते.
रास्त भाव दुकान व गोदामांची कागदोपत्री तपासणी
वास्तविक गोदामातील धान्याची प्रांताधिकारी,तहसीलदार,पुरवठा निरीक्षक,जिल्हा पुरवठा अधिकारी आदींनी अधूनमधून तपासणी करणे आवश्यक आहे;परंतु भेटीचे रजिस्टर संबंधित कार्यालयात पाठवून तपासणी झाल्याचे दाखविले जाते. पुरवठा अधिकारीच या बाबीला दुजोरा देतात. या प्रकारामुळे रास्त धान्य दुकानातील गैरव्यवहाराची मालिका वर्षानुवर्ष चालू असून पुरवठा विभागाचे आणि अधिकाऱ्यांचे त्यावर नियंत्रण नाही.
लाभार्थी किती?
अंत्योदय धान्य योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकेवर गहू आणि तांदूळ दिला जात असतो. २५ किलो तांदूळ आणि दहा किलो गहू शिधापत्रिकांवर दिला जातो, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती तांदूळ आणि गहू दिला जातो.हे प्रमाण तांदूळ तीन किलो तर गहू दोन किलो आहे. डहाणू तालुक्यात अंत्योदय योजनेअंतर्गत ९०७४ शिधापत्रिका आहेत. या शिधापत्रिकावर २१४८.९६ क्विंटल तांदूळ आणि ८५९.५५ क्विंटल गहू पुरवठा करणे अपेक्षित आहे. प्राधान्यक्रम योजनेचे ९१ हजार तीनशे तीन लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी दर महिन्याला दोन हजार ५०९ क्विंटल तांदूळ आणि एक हजार ६७२ क्विंटल गहू असे धान्य पुरवले जाते.
अत्याधुनिक यंत्रणा, तरी चोरवाटा
रास्त भाव दुकानांसाठी सरकारने पॉस मशीन यंत्रणा आणि ऑनलाइन व्यवहार ठेवल्यामुळे गैरप्रकारांना काही प्रमाणात नक्कीच आळा बसेल, असा शासनाचा उद्देश होता; परंतु धान्याच्या चुकीच्या नोंदी, कमी प्रमाणात धान्य देणे याशिवाय कुटुंबातील सदस्य संख्या लक्षात घेऊन न धान्य देणे असे प्रकार सुरू असून डहाणू तालुक्यातच नव्हे तर पालघर जिल्ह्यात वजनाची घट तयार करून हजारो किलो धान्याची हेराफेरी करत गोरगरिबांना मिळणाऱ्या धान्यात पुरवठा विभात अफरातफर करत आहे.
कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू
याबाबतचे पुरावे ‘लक्षवेधीच्या हाती आल्याने पुरवठा विभाग खडबडून जागा झाला आहे. गोदाम कर्मचारी आणि पुरवठा निरीक्षकांची याबाबत चर्चा झाली असून कागदपत्र घेऊन त्याची जुळवाजवळ चालू असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे दरम्यान प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे सांगून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे मान्य केल्याने पुरवठा विभागाचे धाबे दणाणले आहेत.

















