पालघर – योगेश चांदेकर
पालघर: डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ ॲकॅडमिक एक्सलन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्याने स्थानिक म्हणजे परिसरातील सासवंद येथील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड चालविण्याचा प्रकार सुरू केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ ॲकॅडमिक एक्सलन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होती. मात्र, संस्थेचे अधिकारी रजत प्रजापती यांनी स्थानिकांविरोधात नकारात्मक भूमिका घेतली असल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे. संस्थेत स्थानिक कामगारांची भरती करण्यास ते मज्जाव करत आहेत? एवढेच नव्हे तर संस्थेत कामावर असलेल्या स्थानिक कामगारांनाही जाणीवपूर्वक त्रास देत असून, ते काम सोडून कसे जातील, असाच प्रयत्न प्रजापती यांनी चालविल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. या माध्यमातून कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आणण्याचाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
धुंदलवाडी येथील या संस्थेच्या माध्यतातून परिसरातीलच आदिवासी लोकांना प्राधान्याने रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, प्रजापती यांनी मनमानीपणा करत कठोर भूमिका घेतल्याने अनेकांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे? परिणामी, परिसरातील गावांमधील ग्रामस्थ आणि कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी लवकरच या संस्थेवर आणि रजत प्रजापती यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची तयारी चालविली आहे. तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
दाद तरी कुठे मागणार?
एकीकडे पोटाची भूक भागविण्याचा प्रश्न असतानाच दुसरीकडे संस्थेतील अधिकारी प्रजापती यांच्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा अनुभव कामगारांना येत आहे. मात्र, विरोध दर्शविल्यास कधीही बेरोजगारीचे संकट कोसळण्याची भीती असल्याने प्रजापतींच्या मनमानीविरोधात दाद तरी कुठे मागणार, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. त्यांच्या याच असहायतेचा गैरफायदा घेत प्रजापती यांनी त्रास देण्याचा प्रकार चालविल्याने रोष व्यक्त होत आहे.
परिसरातील लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा
आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगाराच्या अपेक्षित संधी उपलब्ध नाहीत. त्यातच वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ ॲकॅडमिक एक्सलन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये स्थानिकांची भरती करण्यास मज्जाव केला जात असल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे? त्यामुळे परिसरातील लोकप्रतिनिधींनी या मुद्द्याची दखल घेऊन आवश्यक पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.