राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याच्या निर्णयानंतर आता शालेय शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांमधील समित्यांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील समित्याही पाच समित्यांमध्ये एकत्रित केल्या आहेत.
राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा विविध समित्यांमधील प्रशासकीय कामकाजात जाणारा वेळ आता वाचणार असून हा वेळ अध्यापनासाठी वापरता येणार आहे. राज्यातील अनुदानित आणि अंशत: अनुदानित अशा खासगी अनुदानित शाळांमध्ये आतापर्यंत शाळा व्यवस्थापन, परिवहन, माता पालक, शालेय पोषण आहार योजना, पालक शिक्षक संघ, तक्रार पेटी, सखी सावित्री, महिला तक्रार निवारण, विद्यार्थी सुरक्षा, नवभारत साक्षरता, तंबाखू संआणियंत्रण अशा जवळपास १७ समित्या कार्यान्वित होत्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय एप्रिल २०२५मध्ये घेण्यात आला. त्याचप्रमाणे आता शालेय शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांच्या शाळा स्तरावरील समित्यांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय अध्यादेशाद्वारे जाहीर केला आहे.
त्यामुळे आता यापुढे शाळा व्यवस्थापन, सखी सावित्री, महिला तक्रार निवारण/अंतर्गत तक्रार, विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा विकसन आणि शाळा अशा पाचच समित्या शाळा स्तरावर असणार आहेत. यापूर्वी असणाऱ्या १७ समित्यांचा या पाच समित्यांमध्ये एकत्रीकरण केले आहे.
















