पालघर-योगेश चांदेकर
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
पालघरः भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्व संबंधित यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
पालघर जिल्ह्यात आज व उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवकांना अतिवृष्टीच्या काळात फिल्डवर थांबण्याचे आदेश दिले असून, शक्य असेल ती सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अनेक मार्गावरील वाहतूक पुरामुळे बंद
शासन आणि प्रशासनाने अतिवृष्टीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली असून, जुन्या किंवा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे देहार्जे नदीवरील शीळ गावाकडील बाजूच्या पुलावरून पाणी जात असल्याने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील वाहतूक बंद आहे. याशिवाय शेलपाडा ते मालवाडा या रस्त्यावरील मोरीवरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूकही बंद करण्यात आली आहे. वाडा-कळंबे, देवघर ते बिलोशी गोरे ते भोईरपाडा या रस्त्यांवरील वाहतूकही बंद आहे.

‘या’ मार्गावरील वाहतूकही बंद होण्याची शक्यता
मनोर, वैतरणा व हात नदीला पूर आल्यामुळे तेथील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. मनोर-कोळसापूर येथील रस्त्यावर पाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हाही रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.

शाळांना उद्या सुट्टी
हवामान खात्याने किनारपट्टीवर पुढील २४ तासांसाठी इशारा दिल्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीलगत ताशी पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रमुख बंदरांवर क्रमांक तीनचा बावटा लावण्यात आला असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा मिळाल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

















