पालघर-योगेश चांदेकर
पालघरः राज्यात धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे याला विरोध करण्यासाठी व आदिवासी आरक्षण बचावण्यासाठी आता वेगवेगळ्या कृती समित्या स्थापन करण्यात आल्या असून पालघर येथे आदिवासी आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात बंजारा व धनगर समाजाकडून घुसखोरी होत असल्याचा आरोप करीत या समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनाच्या वेळी ‘आदिवासी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,’ आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यात घुसखोरांना प्रवेश नाही’ अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात आदिवासींच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते; परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित वगळता अन्य कुणीही सहभागी झाले नव्हते.

मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न
या वेळी आ. निकोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेऊन सरकार मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आरक्षणाचे मुद्दे उपस्थित करून एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकावत आहे.तसेच सरकारचे हे षडयंत्र आहे. या षडयंत्राला कोणीही बळी पडू नये. या आंदोलनात आम्ही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सहभागी होण्याची विनंती केली होती. विरोधी पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. मात्र यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार राजेंद्र गावित हेच उपस्थित आहेत. वास्तविक आम्ही आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडून येतो. त्यामुळे या आंदोलनात सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित होते; परंतु ते का आले नाहीत, हे समजू शकले नाही असेही यावेळी निकोले म्हणाले

आरक्षणातील घुसखोरी खपवून घेणार नाही
आदिवासी समाजाने बलिदान दिले आहे. आमच्या मुला-मुलींना शिक्षण, नोकरी आणि राजकारणात योग्य संधी मिळावी, म्हणून संविधानाने आम्हाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे; मात्र आज बंजारा व धनगर समाज आमच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. आदिवासींच्या हक्कावर कोणी गदा आणली, तर त्याला कडाडून विरोध करण्यात येईल. सरकारने या संदर्भात तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ. निकोले यांनी दिला.
‘हे’ होते उपस्थित
या वेळी आमदार विनोद निकोले, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार राजेश पाटील,कष्टकरी संघटनेचे
ब्रायन लोबो,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ चौधरी, जयेंद्र दुबळा, भरत वायेडा मधुबाई धोडी रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, लहानी दौडा आदी उपस्थित होते.
कोट
‘महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासींच्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्याबाबत सूतोवाच केले आहे. हा आदिवासींच्या हक्कावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थितीत आदिवासी समाज हे अतिक्रमण होऊ देणार नाही. त्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन उभारू.
विनोद निकोले, आमदार, डहाणू

















