गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्यातील हप्ता कधी येणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. यावर अखेर पडदा टाकत सप्टेंबर महिनीच्या हप्ता हा शुक्रवारपासून (10 ऑक्टोबर) देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे या लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे. पण, तरीही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिर्वाय असल्याचे सांगितले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीत सुरूवातीला ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी केवायसीची अट शिथिल करण्यात आली होती. यामुळे तांत्रिक अडचण असूनही अनेक पात्र भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे की, जरी सप्टेंबरचा हप्ता केवायसीशिवाय जमा झाला असला तरी, ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, जी लाभार्थी बहीण केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणार नाही, त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर पुढील हप्ता नियमितपणे जमा होण्यासाठी सर्व पात्र भगिनींनी त्वरित आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर म्हंटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून (10 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती,” असे ट्वीट करत म्हटले आहे.

















