पुणे: कोरोनाशी संबंधित प्रकरणात राज्यासाठी चिंतेची बाब समोर आली आहे. पुणे विमानतळावर एक महिला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ही प्रवासी सिंगापूरहून पुण्यात आली आहे. कोविड 19 पॉझिटिव्ह प्रवासी आढळल्याने पुण्यात चिंतेचे वातावरण आहे. विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जात आहे. सिंगापूरहून आलेल्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंगही करण्यात आले. थर्मल स्क्रिनिंगच्या अहवालात सिंगापूरची ही महिला प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशाचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता. पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे म्हणाले की, कोविड 19 पॉझिटिव्ह प्रवासी आढळल्यानंतर काळजी करण्याची गरज नाही. गेल्या 8-10 दिवसांपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी सुरू आहे. सिंगापूरहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाचा नमुनाही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे. पुण्यात सध्या 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
महिलेला घरी केले क्वारंटाईन
कोविड 19 पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेचे वय 32 वर्षे आहे. ही महिला पुण्यातील कोथरूडची आहे. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, मात्र चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व तपशील समजेल. तोपर्यंत महिलेला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. संबंधित महिलेबाबत पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही, त्यामुळे तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.
पुण्यात सध्या 54 कोरोना रुग्ण
चीनसह अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील सारख्या देशांमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन भारताला आधीच सतर्क करण्यात आले आहे. केंद्र सरकारने विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय प्रवासादरम्यान आणि विमानतळावर मास्क वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याच सूचनांनंतर संबंधित प्रवाशाची पुण्यात चाचणी केली असता संबंधित महिला प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.